दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद, तपासकामी पोलिसांपुढे आव्हान
संगमनेर : शेजारील सर्व घराच्या कड्या लावून ६ सशस्त्र दरोडेखोरांनी ३ घरावर दरोडे टाकले. महिलांना चाकूचा धाक दाखवुन व मारहाण करून अंगावरील दागिने ओरबाडले. घरातील कपाट फोडून ४ लाख ८५ हजाराचे सोन्याचे दागिने, ४३ हजाराची रोकड व ३ मोबाईल असा साडेपाच लाखाचा ऐवज लांबविला. रविवारी मध्यरात्री हि घटना शहरालगत असलेल्या पावबाकी व सुकेवाडीत घडली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
दरोड्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. मात्र, पोलिस येण्याच्या अगोदर दरोडेखोर पसार झाले. पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी भेट दिली. सोमवारी नाशिक येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना प्राचारण करण्यात आले. ६ दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असले तरी तपासाकामी पोलिसांपुढे आव्हान राहणार आहे. चाकू, लोखंडी टामी व पाईप हातात घेऊन दरोडेखोरांनी प्रथम सुनील शिवाजी नाईकवाडी (वय ४५, पावबाकी) यांच्या घरावर दरोडा टाकला. १ लाख २२ हजाराचे दागिने, ३० हजाराची रोकड व मोबाईल घेऊन दरोडेखोर पसार झाले. पावबाकी येथील डोंगरे मळा येथे राहणाऱ्या रेश्मा नीती दातीर (वय ३०) यांच्या घरावर दरोडेखोरांनी चाल करत वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत घरातील सामानाची नासधूस केली. कपाट फोडून ५३ हजाराचे सोन्याचे दागिने, १३ हजाराची रोकड व मोबाईल घेऊन पोबारा केला. त्यानंतर दरोडेखोरांनी जवळच असलेल्या सुकेवाडीकडे आपला मोर्चा वळवला. दरोडेखोरांनी सुकेवाडीचे उपसरपंच सुभाष कुटे यांच्या वस्तीवर जात आसपासच्या घरांना कड्या लावून घेतल्या आणि उत्तम सखाराम कुटे (वय ५९) यांच्या घरात प्रवेश करत ६० हजाराचे सोन्याचे दागिने, १ लाख २५ हजाराची रोकड व मोबाईल घेऊन ते पसार झाले. सुनील शिवाजी नाईकवाडी यांच्या फिर्यादीवरून ६ दरोडेखोरांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे अधिक तपास करीत आहे.