कोळपेवाडी वार्ताहर :- जनतेच्या विकासाचे मुलभूत प्रश्न सोडवितांना ज्यावेळी लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या मागे खंबीरपणे उभा राहतात त्यावेळी काम करण्यासाठी मिळणारी गोडी काही वेगळीच असते ती गोडी मुख्याधिकारी म्हणून काम करतांना कोपरगाव शहरात मिळत आहे. पाणी प्रश्न मार्गी लागल्याचा जेवढा आनंद नागरिकांना झाला तेवढाच आनंद प्रशासनाला देखील झाला असून प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्याची आ. आशुतोष काळे यांची तळमळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी ५ नंबर साठवण तलावाच्या काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले.
मागील अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ५ नं.साठवण तलावाच्या काँक्रिटीकरण कामास प्रारंभ झाला असून यावेळी आयोजित कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना मुख्याधिकारी शांताराम गोसावी बोलत होते.
ते म्हणाले की, मुख्याधिकारी म्हणून ज्या शहरात काम करत असतांना त्या शहराचा मौलिक आणि जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्याची संधी मिळते त्यावेळी मोठे समाधान मिळते. आ. आशुतोष काळे यांनी प्रशासनाच्या पाठीशी उभे राहून, कोपरगाव शहरातील नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पाणी प्रश्नाची वेळोवेळी जाणीव करून दिली. येणाऱ्या अडचणी सोडवून सर्वोतोपरी सहकार्य केले. प्रगत शहरातील विकास आ. आशुतोष काळे यांनी जवळून पाहिला असून विकसित शहर कसे असावे याबाबत त्यांचा अभ्यास आणि अनुभव दांडगा आहे. त्यामुळे अशा सुविधा कोपरगावच्या नागरिकांना का मिळू शकत नाही? हि तुमची जबाबदारी नाही का? असा प्रश्न आ.आशुतोष काळे पदोपदी प्रशासनाला विचारतात.
५ नं. साठवण तलावाच्या बाबतीत चर्चा सुरु असतांना साठवण तलावाची डिझाईन कशी असावी, पाणी पुरवठा योजना स्वावलंबी कशी होईल व करदात्या कोपरगावकरांवर कराचा जास्त भार कसा पडणार नाही याबाबत आ. आशुतोष काळे यांनी सातत्याने योग्य मार्गदर्शन केले. आजही मला विचारले की, काम कधी पूर्ण होणार. सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत एवढी काळजी घेवून प्रशासनाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या आ. आशुतोष काळे यांची तळमळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी व कौतुकाकास्पद आहे. त्यामुळे मी देखील मुदतीच्या आत साठवण तलावाचे काम करून देण्याची प्रशासन म्हणून माझी जबाबदारी मी पूर्ण करीन अशी ग्वाही मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी यावेळी दिली.