संगमनेर : तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या चाळीस वर्षे वयाच्या आरोपीच्या पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी शिवारात आळेफाटा पोलिसांनी मुस्क्या आवळल्या.
घारगाव परिसरातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर नवनाथ आनंदा चव्हाण (वय ४०) रा. खैरदरा, कोठे बुद्रुक ता.संगमनेर याने २३ एप्रिल २०२२ रोजी अत्याचार केला होता. या प्रकरणी त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को), अनुसूचित जाती जमाती कायदा आदी कलमान्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून नवनाथ चव्हाण हा परागंदा झाला होता, घारगाव पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र तो मिळून आला नाही.याच दरम्यान रविवार दि.३० एप्रिल रोजी नवनाथ चव्हाण हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात येणार असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांना समजली होती, त्यावेळी पोलिसांनी चव्हाण यांच्या मुस्क्या आवळल्या. नवनाथ चव्हाण याला आळेफाटा पोलिसांनी घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरचा आरोपी तब्बल एक वर्षापासून फरार होता. ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, विनोद गायकवाड, पंकज पारखे, पोपट कोकाटे, अमित माळुंजे, हनुमंत ढोबळे,सचिन रहाणे, प्रशांत तांगडकर यांच्या पथकाने केली.