देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे साखर कारखाना चालू करण्यासाठी बाहेरील लोकांची गरज नाही. तालुक्यात अनेक सक्षम माणसे आहेत. त्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे. स्वच्छ प्रतिमेचे संचालक निवडून द्यावेत. त्यांनी शनि शिंगणापूर येथे शनिदेवाच्या डोक्यावर हाथ ठेवून निस्वार्थ कामाची शपथ घ्यावी. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी. असा सूर शेतकरी मेळाव्यात उमटला.
राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद ताराचंद गाडे होते. कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ, अरुण कडू,पंढरीनाथ पवार, विजय कातोरे ,माजी सुखदेव मुसमाडे, ज्ञानेश्वर कोळसे, भरत पेरणे, अनिल जाधव, ॲड. रावसाहेब करपे, बाळासाहेब खुळे, विलास शिरसाट, विजय कातोरे उपस्थित होते.

माजी संचालक गंगाधर तमनर, बाळासाहेब पेरणे, नारायण टेकाळे, चंद्रकांत कराळे,बाबासाहेब देशमुख, विनायक भुसारे, बाळासाहेब उंडे, भगवान गडाख, सुभाष डौले, कांतीराम वराळे, संभाजीराजे तनपुरे, सुधाकर शिंदे, वसंत गाडे, संजय पोटे, राजेंद्र लांडगे यांनी मनोगते व्यक्त केली.
बंद पडलेला कारखाना सुरू व्हावा.हि सभासद व कामगारांची भावना आहे. कारखान्याला ऊर्जितावस्था आणावी. गतवैभव प्राप्त व्हावे. मागील संचालक मंडळाने चुका केल्या. जिल्हा बँकेला हमीपत्रा द्वारे स्टॅम्पवर सह्या करून स्वतःची मालमत्ता कारखान्याच्या कर्जाच्या पुनर्गठनासाठी लिहून दिली. त्यामुळे कारखान्यावरील कर्ज संबंधित संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेतून वसुली करण्यासाठी न्यायालयात याचिका करावी. मागील निवडणुकीत कारखाना कर्जमुक्त करण्याच्या वल्गणा करणारे अपयशी ठरले. त्यांना निवडणुकीत उतरण्याचा नैतिक अधिकार नाही. असेही सभासदांनी सांगितले.

अहिल्यानगर येथे कारखान्याच्या निवडणुकीचे कार्यालयाला विरोध आहे. राहुरी फॅक्टरी येथे निवडणूक कार्यालय असावे. प्रारूप मतदार यादी राहुरी फॅक्टरी येथे कारखान्याच्या कार्यालयात उपलब्ध व्हावी. तेथेच हरकती घेण्या पासून मतदान प्रक्रिये पर्यंत कामकाज व्हावे. अशी मागणी सभासदांनी केली.