कोपरगाव दि.०४ – कोपरगांव विधानसभा निवडणुकीत विविध सामाजिक संघटना, संस्था यांचा सहभाग महत्त्वाचा असून राष्ट्रीय कर्तव्य भावनेने मतदारांना जागृत करण्याचे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी केले.
कोपरगांव विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविली जात आहे. याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेन्ट्रलच्यावतीने मतदार जागृतीविषयी घोषवाक्य असलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या सुधाभाभी ठोळे, विजय बंब, योगाचार्य उत्तमभाई शहा, स्वच्छतादूत सुशांत घोडके, रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश काले आदी उपस्थित होते.
मतदार जनजागृती संदर्भात चित्रकला स्पर्धा, जनजागृती फेरी, तसेच माध्यम कक्ष असे विविध उपक्रम हाती घेतले असल्याचे सावंत यांनी सांगितले. सुदृढ लोकशाहीसाठी, देशासाठी मतदारांनी उत्स्फूर्त मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. भित्तीपत्रके कोपरगांवातील दुकाने, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार आहेत.