कोळपेवाडी वार्ताहर :- समृद्ध सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या मतदार संघातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करून भाविकांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी केलेल्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून मतदार संघातील विविध देवस्थानच्या विकासकामांच्या ०३ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मतदार संघाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करीत असतांना मागील साडे तीन वर्षात मुलभूत विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून मतदार संघाची रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणली. त्याच बरोबर पौराणिक व ऐतिहासिक अशी वेगळी ओळख असलेल्या मतदार संघात असलेल्या सर्वच जागृत देवस्थानांचा विकास देखील रखडलेला होता. या देवस्थानच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विकास कामांना निधी मिळावा याकरिता महाविकास आघाडी सरकारकडे प्रस्ताव दाखल करून पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा करीत होतो.
त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील राहाता तालुक्यातील श्री चांगदेव महाराज देवस्थान पुणतांबा, तसेच कोपरगाव तालुक्यातील श्री दत्त देवस्थान माहेगाव देशमुख, श्री लक्ष्मीआई माता देवस्थान कोकमठाण, श्री सिद्धेश्वर देवस्थान मंजूर, श्री भैरवनाथ देवस्थान चांदेकसारे व श्री जगदंबा माता देवस्थान ब्राम्हणगाव या सर्व देवस्थानांच्या ०३ कोटीच्या विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्षात कामास प्रारंभ होवून भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.