मताधिक्य नाही फक्त जनतेच्या समस्या पाहिल्या -आ.आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेने सेवा करण्याची संधी दिली त्यावेळी कोणत्या गावाने किती मताधिक्य दिले हे पाहिले नाही पाहिल्या फक्त जनतेच्या समस्या. त्यामुळेच संपूर्ण मतदार संघाचा सर्वांगीण विकास होवून यापूर्वी जे रस्ते होवू शकले  नाही त्या रस्त्यांचा देखील विकास या पाच वर्षात करून दाखविला असल्याचे  प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले. आ.आशुतोष काळे यांनी संवत्सर येथे विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी त्यांच्या हस्ते कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ७० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या संवत्सर (दशरथवाडी) ते दहेगाव रस्त्याच्या डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी २२.७८ कोटी रुपये निधीतून सुरु असलेल्या संवत्सर ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली.

पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघाच्या विकासासाठी ३४०० कोटी निधी मिळविला त्यामुळे मतदार संघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात मोठी मदत झाली. मतदार संघातील पूर्व भागातील अनेक गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या अनेक रस्त्यांना निधी दिला. यामध्ये संवत्सर देखील मागे नाही. संवत्सर (दशरथवाडी) ते दहेगाव हा रस्ता देखील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा होता. त्याबाबत नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार निधी देवून हा रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे.

३० बेडचे ग्रामीण रुग्णालय, मनाई वस्ती औद्योगिक वसाहत, संवत्सर-कान्हेगाव रस्ता, पवार गिरणी-संवत्सर-भोजडे-धोत्रे रस्ता, तलाठी कार्यालय अशा महत्वपूर्ण कामांसह रस्ते व विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देवून पूर्व भागात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या मुलभूत समस्या मार्गी लावून विकासाच्या बाबतीत पूर्व भागाला न्याय दिला. मी केलेल्या विकासकामांची पावती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला मिळणारच आहे मात्र जास्तीत जास्त मताधिक्य वाढविण्याची जाबाबदारी तुमची आहे असे उपस्थित कार्यकर्त्यांना आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.

त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी २०१९ ते २०२४ या पाच वर्षात कोपरगाव मतदार संघाचा जो विकास झाला तो विकास आजवर कधीच झालेला नाही. यामध्ये पूर्व भागाचा देखील समावेश असून संवत्सर गाव देखील अपवाद नाही. जनता विकासावर समाधानी असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आ.आशुतोष काळे पुन्हा आमदार होतील अशी ग्वाही देवून त्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्न करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here