देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांच्यात सामंजस्य करार करणेत आला आहे. उभयंतांमध्ये संशोधन, नवकल्पना, उद्योजकता आणि शैक्षणिक तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून उभयंतांमध्ये तंत्रज्ञान अदान-प्रदान करणेस तसेच उद्योजकता, संशोधन प्रकल्प आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीस चालना मिळेल असा विश्वास महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी व्यक्त केला.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांचे उपस्थितीत कृषि महाविद्यालय, पुणे येथे या करारावर स्वाक्षरी करणेत आली. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या वतीने अधिष्ठाता (कृषि) डॉ. उत्तम चव्हाण आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासाळकर तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. बी.एफ. जोगी आणि डॉ. पी.ए. पवार यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. संसाधन सामायिकरण, कृषि विषयक डिजिटल तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन, विस्तार व सामाजिक शास्त्र या क्षेत्राशी निगडीत प्रमाणपत्र, पदविका, पदवी तसेच आचार्य अभ्यासक्रमात संयुक्त भागीदारी, विदयार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचेकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, संमेलन, परिषद आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे संयुक्त आयोजन असे या कराराच्या संयुक्त भागीदारीचे स्वरूप आहे. आगामी पाच वर्ष या कराराची मुदत असणार आहे.