महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद)अध्यक्षपदी राजेश परजणे बिनविरोध

0

कोपरगांव : दि .२०

महाराष्ट्र राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या ( महानंद) अध्यक्षपदी कोपरगांव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

मुंबईतील गोरेगांव येथे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या कार्यस्थळावर बुधवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी परजणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची विनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी सूचक म्हणून संचालक विनायकराव पाटील तर अनुमोदक म्हणून संचालक वैभव पिचड यांनी ठराव मांडले. दि. ८ जानेवारी रोजी महानंदची निवडणूक पार पडली. २१ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत १६ संचालक आधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यात उर्वरीत महाराष्ट्र विभागातून श्री परजणे हेही बिनविरोध निवडून आलेले आहेत.

महासंघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना गोदावरी दूध संघाने कार्यक्षेत्रामध्ये राबविलेल्या आहेत. त्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेले आहे. परजणे हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष म्हणून सद्या कार्यरत आहेत. याशिवाय भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन (आनंद) गुजरात तसेच कॅनरा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. अनेक सहकारी, शासकीय, धार्मिक,  निमशासकीय संस्थांबरोबरच शिक्षण संस्थांवर ते सद्या कार्यरत आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल परजणे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, जि. प. च्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, महासंघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रबापू जाधव आदिंनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here