राहुरी पोलिस ठाण्याला साडेसातीचे ग्रहण?

0

राहुरीत अधिकारी टिकत नसल्याने गुन्हेगारीचा आलेख वाढला ; पाच वर्षांत दहा पोलिस निरीक्षक

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे :

                राहुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांची अवघ्या सहा महिन्यात बदली झाली. मागील पाच वर्षात दहा पोलिस निरीक्षक झाले. नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक संजय सोनवणे अकरावे अधिकारी ठरले आहेत. राहुरीत पोलिस अधिकारी टिकत नसल्याने राहुरी पोलिस ठाण्याला साडेसातीचे ग्रहण लागलेआहे का? यातुन माञ गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.

उंबरे येथे अल्पवयीन मुलींना मोहित करून शिकवणीच्या बहाण्याने करण्याच्या प्रयत्न धर्मपरिवर्तन केल्याप्रकरणी विनयभंग, लग्न व धर्मांतरासाठी दबावाचे तीन गुन्हे दाखल झाले. दोन समाज आमनेसामने ठाकले. एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तब्बल ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्याचे विधानसभेत पडसाद उमटले. राहुरीत आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा झाला. पोलिस प्रशासनावर आरोप झाले. पहिला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला चौदा तास पोलिस ठाण्यात ताटकळत बसविले. खऱ्या आरोपींना पाठीशी घातल्याचा पोलिसांवर आरोप करण्यात आले. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून अटकसत्र राबविले. यामुळे पोलिसांनी एका समाजाला सहकार्य केल्याच्या आरोपांच्या फैरी झडल्या. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो व राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर यांनी उंबरे येथे जाऊन फिर्यादी मुलींच्या कुटुंबाशी व तपासी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कानूनगो यांनी पत्रकार परिषदेत पोलिस तपासातील त्रुटींवर व भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. राज्य सरकारकडे अहवाल देऊन, प्रसंगी सीबीआय तपासाची मागणी करणार असल्याचे कानूनगो यांनी सांगितले. या घटनेला चार महिने उलटल्यावर या प्रकरणी चौकशीसाठी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांची अहमदनगर येथे नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर सायबर क्राइम विभागाचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांची नेमणूक झाली आहे.

चौकट

  ■ पाच वर्षातील अधिकाऱ्यांची नावे

                 गेल्या पाच वर्षातील पोलिस निरीक्षक व त्यांचा कार्यकाळ अविनाश शिळीमकर (६ महिने), हनुमंत गाडे (९ महिने), मुकुंद देशमुख (१६ महिने), हनुमंत गाडे (४ महिने), नंदकुमार दुधाळ (५.महिने), सपोनी शंकरसिंह राजपूत (८ दिवस), राजेंद्र इंगळे (५ महिने), प्रताप दराडे (११ महिने), मेघश्याम डांगे (५ महिने), धनंजय जाधव (६ महिने) पाच वर्षात दहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here