प्रांतिक तैलीक महासभेच्यावतीने गुणवंत विद्यार्थींनीचा सत्कार
नगर – आज शिक्षणाबरोबरच करिअरमध्ये अनेक संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून त्यादृष्टीने अभ्यास केल्यास करिअर होण्यास मोठी मदत होऊ शकते. समाजातील आज अनेक विद्यार्थी आपल्या मेहनतीने व कर्तुत्वाने विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवित आहेत. त्यांच्या यशाचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. प्रांतिक तैलीक महासभेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. अशा उपक्रमाचा समाजाला मोठा फायदा होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरि प्रयत्न केले जात आहे. यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनीही इतरांना मार्गदर्शन करुन त्यांची प्रगती साधावी, असे आवाहन प्रांतिक तैलीक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले. प्रांतिक तैलीक महासभेच्यावतीने सी.ए उत्तीर्ण कु.नेहा रावसाहेब देशमाने व बी.फार्मसी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या कु.नंदिनी प्रमोद डोळसे या गुणवंत विद्यार्थींनीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे, धोंडीराम देशमाने, पोपट शेजवळ, बाळासाहेब हजारे, रावसाहेब देशमाने, देवीादस साळूंके आदिंसह समाजबांधव उपस्थित होते.
याप्रसंगी धोंडीराम देशमाने म्हणाले, प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने समाजोन्नत्तीचे होत असलेले काम कौतुकास्पद असेच आहे. समाजातील महिला, विद्यार्थी यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमातून समाजाचे मोठे संघटन उभे राहत आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे समाजासाठी अभिमानास्पद आहे. त्यांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट शेजवळ यांनी केेले तर आभार बाळासाहेब हजारे यांनी मानले.