संगमनेर : तालुक्यातील वडगावपान येथील साई माया लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यावसायावर पोलिस पथकाने छापा टाकत २२ वर्षीय ठाणे जिल्ह्यातील युवतीची सुटका केली. तर ४१ हजार २० रुपयांचा मुद्देमालासह दोघांना अटक करून तिघांवर गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री ९ वाजता श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी प्रतीक बाळासाहेब चित्तर, खेमराज कृष्णराज उपाध्याय (वय २३, वडगावपान, ता. संगमनेर), पुनम उर्फ सुजाता संजय आगरे (संगमनेर) हे तिघे २२ वर्षीय ठाणे जिल्ह्यातील युवतीकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. अवैद्यरित्या कुंटणखाना चालवित होते. वडगावपान निळवंडे रोडवरील हॉटेल विशाल गार्डनच्या पाठीमागे असलेल्या साई माया लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके यांना मिळाली. पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले, सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, कॉन्स्टेबल सुरेश औटी, लगड, नितीन शिरसाठ, वाकचौरे, पोलिस नाईक निलेश मेटकर, दिपक रोकडे यांनी लॉजवर छापा टाकला. छाप्यात रोख रक्कम, मोबाईल, सिमकार्ड व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले. फौजदार विष्णू कान्हु आहेर यांच्या फिर्यादीवरून तिघांवर तालुका पोलिसांनी अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक चित्तर व खेमराज उपाध्याय याला अटक करण्यात आली असून पूनम आगरे हि महिला फरार आहे. अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत. या घटनेने लॉज चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. तर असे व्यवसाय सुरु असणाऱ्या शहर व तालुक्यातील अन्य हॉटेल व लॉजवर कारवाईची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे स्वागत केले आहे.