कोळपेवाडी वार्ताहर :- राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळावी व नागरिकांना चांगली सेवा मिळावी या उद्देशातून महायुती शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील लौकी शहापूर, सोनारी, चांदगव्हाण व लौकी या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीच्या कामाला बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे Ashutosh Kale यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांना चांगल्या इमारती नसल्यामुळे नागरिकांना सेवा सुविधा देण्यात येणाऱ्या अडचणी व मोडकळीस आलेल्या इमारतीत गावचा कारभार पाहणारे गावकारभारी व प्रशासकीय अधिकारी यांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मतदार संघातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी आ. आशुतोष काळे यांनी निधी दिला आहे. मतदार संघाच्या विकासाला गती देवून या विकासाबरोबरच शासकीय कार्यालयांचा देखील विकास करण्यावर भर देवून अनेक शासकीय कार्यालयांना आ. आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. लौकी, शहापूर, सोनारी, चांदगव्हाण व लौकी या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतींना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामपंचायत कार्यालय हे अतिशय जवळचे व महत्वाचे सरकारी कार्यालय असते. शासनाच्या विविध योजना चांगल्या प्रकारे राबविल्या जाव्यात यासाठी ग्रामपंचायत कार्यालय देखील सर्व सोयी सुविधायुक्त असणे तेवढेच गरजेचे आहे. या उद्देशातून आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील ज्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतींची दुरावस्था झाली आहे त्या सर्व ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी दिला आहे. या ग्रामपंचायत कार्यालयांना निधी देतांना त्या ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याकडे आहे की विरोधकांकडे याचा त्यांनी कधीच विचार केला नाही. नागरिकांच्या अडचणी व प्रश्न सुटावे हा एकमेव उद्देश त्यांनी सातत्याने डोळ्यापुढे ठेवला आहे. त्यांच्या कामाची जनतेकडे नोंद असून नुकत्याच पार पडलेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तब्बल १२ ग्रामपंचायतींची सत्ता मतदारांनी काळे गटाकडे सोपवून त्यांच्या कामाची पावती दिली आहे. लौकी शहापूर, सोनारी, चांदगव्हाण व लौकी या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहे.