शेतकरी विकास मंडळाची राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे तक्रार
संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून आढावा बैठकीच्या नावाखाली भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून या निवडणुकीसाठी मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय बैठका होत आहेत, यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असून याबाबतची तक्रार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडे केली असल्याचे शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार शंकर खेमनर व विजय सातपुते यांनी सांगितले.
याबाबत शेतकरी विकास मंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात शंकर खेमनर व विजय सातपुते यांनी म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे.मतदानाच्या आदल्या दिवशी काल गुरुवारी आढावा बैठकीच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाकडून निवडणुकीच्या प्रचारार्थ काम केले जात असून हे पूर्णपणे आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. मतदान सुरू होण्यापूर्वी २४ तास अगोदर प्रचार बंद करणे अपेक्षित असते आणि या आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे ही गरजेचे असते. मात्र असे असतानाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शासकीय बैठकांच्या नावाखाली राजकीय हेतूने मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी या बैठका घेतल्या आहेत.संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलचा पराभव निश्चित दिसत असल्याने या बैठकांना बाजार समितीच्या मतदारांसह सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे सह प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, यांना निमंत्रित केले आहे.तसेच मंत्र्यांच्या कार्यालयातुुन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना फोन करून बोलावले जात आहे. ही शासकीय बैठक दिसत असली तरी हा पूर्णपणे राजकीय हेतू आहे.त्यामुळे प्रथमदर्शनी ही बाब आदर्श आचारसंहितेेेचा भंग करणारी असल्याने या बाबीची निवडणूक प्राधिकरण व जिल्हाधिकारी यांनी तातडीने गंभीर दखल द्यावी अशी मागणी ही विजय सातपुते व शंकर खेमनर यांनी केली आहे.