बालपणी शिक्षणा बरोबरच संस्कार आणि लढण्याचे बळ देण्याचा बाप नावाचा माणूस अर्थात माझे वडील दादाहरी बाबुराव पोळ ……. कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे अत्यंत गरीब कुटुंबात २४/१०/१९४८ ला जन्म झाला. त्यांचे आई वडील दोघेही अशिक्षित मात्र आईचे माहेर वैजापूर व त्या काळात औरंगाबाद जिल्ह्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका संघटित व्हा व संघर्ष करा..” या मूलमंत्राचा अनेक गोर गरीब समाजातील कुटुंबानी आदर्श घेतला आणि काबाड कष्ट करून आजोळीचे औरंगाबादचे आर के त्रिभुवन (माजी जिल्हा परिषद सदस्य),सीताराम त्रिभुवन (विक्रीकर अधिकारी) मनोहर त्रिभुवन (सहकार उपयुक्त) सामाजिक कार्यकर्ते के टी खरे यांच्या कडून शैक्षणिक प्रेरणा घेऊन ज्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारला जात होता. त्या वेळी जेमतेम सातवी पर्यंत शिक्षण घेतले. त्या वेळी नाटेगाव येथील व्हॅलेंटरी शिक्षक कै बाबू गुरुजी यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली .
पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी जाऊन शिक्षण घेण्याची परिस्थती नव्हती. त्यामुळे एस टी महामंडळाचे आबासाहेब निंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा करून एस टी महामंडळात वाहक म्हणून नोकरी स्वीकारली.
घरची गरिबी,त्यात कमी वयात नोकरी लागली एकुलते एक असल्याने आई वडिलांचे लाडके. त्यातच लग्न झाल्यावर तीन मुले झाली. मात्र पहिल्या पत्नीचे अल्पावधीत निधन झाले. मात्र त्यातून सावरून पुन्हा मीराबाई शिंदे यांच्या सोबत दुसरा विवाह केला व तीन मुलांचा नुसता सांभाळ केला असे नाही तर त्या तिघांना दर्जेदार व उच्च शिक्षण दिले. मोठा मुलगा अरुण पोळ सद्या रयत शिक्षण संस्थेचे केपीबी विद्यालयात शिक्षक आहे. तर अँड.दिपक पोळ व इतर अँड.नितीन पोळ कोपरगाव येथे वकील म्हणून काम करतात .
पहिल्या पासून सामाजिक,राजकीय कार्यात सहभागी होत अनेक कामे केली. अत्यंत कमी पगाराच्या नोकरीत मुलांना शिक्षणा बरोबरच संस्कार दिले. वडिलोपार्जित शेती नसताना शेती विकत घेतली. त्यात चांगली पिके घेतली. तर माजी मंत्री शंकरराव जी कोल्हे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक समाज उपयोगी कामे केली.
संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या नाटेगाव येथील संत तुकाराम महाराज माध्यमिक विद्यालयाच्या इमारती साठी स्वतःसह कै साईनाथ मोरे व कै रघुनाथ मोरे यांना शैक्षणिक महत्व पटवून देऊन साडे चार एकर जमीन बक्षीस दिली. अल्प शिक्षण असले तरी वाचनाची आवड. शेती, सहकार, शिक्षण या बरोबरच काम केले. तसेच शिक्षणा बरोबरच संस्काराची पेरणी केल्यामुळे आज त्यांचा नातू बी टेक पर्यंत शिक्षण घेतले तर दोन नाती वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. तसेच कोणतीही वकीली व्यवसायाची पार्श्वभूमी नसताना अँड.दिपक पोळ हे वकील व्यवसाय करत जिल्हा न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. तर अँड.नितीन पोळ हे लोक स्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न समर्थ पणे मांडत असतात.
अशा प्रकारे दादाहरी बाबुराव पोळ यांनी मुलांना शिक्षणा बरोबरच संस्कार देऊन सामाजिक लढ्याचे बळ दिले.
*अँड.नितीन पोळ*
नाटेगाव ता कोपरगाव जि अहमदनगर