संगमनेर : महसूल विभागात मोठ्या प्रमाणात बदल होत असून लोकाभिमुख कामातून मागील काळात जे झाले नाही ते सध्या विविध योजनेतून होणार आहे. पुढील महिन्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून रेशन कार्ड, विविध योजनांची नोंदणी सुरू करत असतानाच शेत जमिनीच्या मोजणीसाठी विशेष मोहीम सुरू होणार असल्याची माहिती नगर दक्षिणचे भाजपाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
शिर्डी मतदार संघात सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालय भारत सरकारच्या वतीने आश्वी बुद्रुक येथे आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजनेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध साधन साहित्य वितरण कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे संगमनेर तालुका अध्यक्ष सतीशराव कानवडे होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. रोहिणीताई निघुते, प्रवरा बँकेचे अध्यक्ष अशोक म्हसे, डॉ.दिनकर गायकवाड़, विनायक बालोटे, भगवान इलग, पदमश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक रामभाऊ भुसाळ, शिवाजी इलग, पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर, पिंप्री लौकीचे भारत गीते, भागवत उबंरकर, जेऊरभाई शेख, हरिभाऊ ताजणे,अशोक जराड, भाऊसाहेब सांगळे, रावसाहेब घुगे, मकरंद गुणे, कनोलीचे ज्ञानदेव वर्पे, गौतम जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सर्व समावेशक काम सुरू आहे. कोविड लसीकरण, मोफत धान्य योजनेमुळे हे सरकार लोकांना आपले वाटत आहे, दूरदृष्टीने देशाचा विकास होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला यातून आत्मविश्वास मिळत असून मागील महसूलमंत्र्यांनी काय केला ? यापेक्षा वेगळे काम सध्या महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील हे करत आहेत. महसूलच्या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम एप्रिल महिन्यामध्ये होणार असून या माध्यमातून सर्व जमिनीची मोजणी अभियान सुरू होणार आहे. पुढील तीन महिन्यात हे काम पूर्ण करणार असून कुणी कितीही गडबड करा, विरोध करा, पण जे संस्कार प्रवरा परिवाराचे आहेत ते पुढे जात असताना सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद हेच आमचे अश्र आहे. आपला विश्वास, कामाची प्रेरणा देणारा आहे असे खासदार डॉ.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. रोहिणीताई निघुते यांनी प्रास्ताविकात जोर्वे आणि आश्वी जिल्हा परिषद गटातील २६ गावांमध्ये सहा हजार नागरिकांना या योजनांचा लाभ मिळाला. याशिवाय बांधकाम कारागिरांसाठी मध्यान भोजन, पेयजल योजनेअंतर्गत विविध गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. ते सांगतानाच २६ गावांमध्ये विकासाचे नवे मॉडेल उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ नागरिकांना विविध साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार अशोक तळेकर यांनी मानले.