देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
अधिकमास पौर्णिमानिमित्त श्रीक्षेत्र ताहराबाद(बेलकरवाडी) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बेलकरवाडी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात पहाटे काकडा भजन,सकाळी महाभिषेक, दुपारी भावगीतांचा कार्यक्रम, सायंकाळी ४ वा. संत -महंतांचे स्वागत व मिरवणूक,५ वाजता महंत शांतीब्रह्म लक्ष्मणजी महाराज पांचाळ यांच्या अमृतमहोत्सव निमित्त ‘गुणगौरव सोहळा’ व सायंकाळी ५.३० वाजता महंत प.पू. जगद्गुरु स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज ( मठाधिपती, श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर.) यांची कीर्तन सेवा होणार आहे. नंतर ८वा. पुरणपोळी पंचांन्न (धोंडा)महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी ह्या ज्ञानदान व अन्नदान यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन बेलकरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
महंत प.पू. जगद्गुरु स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज श्री संत कवी महिपती महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहे. तेव्हा देवस्थानच्यावतीने अरुणनाथगिरीजींचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. स्व. रावसाहेब कोंडाजी पाटील साबळे (अण्णा) माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पावली , नृत्यासाठी गाडकवाडी येथील सुरसे परिवाराचा अश्व, बेलापूर येथील अश्वबग्गी, सनईचौघडा व फटाक्यांच्या आतषबाजीत महाराजांचे स्वागत करण्यात येणार आहे. संत महिपतींच्या दर्शनानंतर अरुणनाथगिरीजी महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी जीवन व संस्कार, राष्ट्रप्रेम’ ह्या विषयावर व्याख्यान देणार आहे. तद्नंतर अरुणनाथगिरीजी महाराजांचा दर्शन सोहळा होईल. महाराज बेलकरवाडीला जाताना ताहराबाद येथील स्वामी समर्थ केंद्राला भेट देऊन बेलकरवाडीकडे प्रस्थान करणार आहे.
श्रावणसरी अधून- मधून बरसत आहे.त्यामुळे ताहराबाद पंचक्रोशी हिरवाईने नटली आहे. अशा आनंदमय वातावरणात श्रावणमास-अधिकमास पर्वणीत हा धार्मिक सोहळा संपन्न होत आहे.