संगमनेर – प्रतिनिधी – संगमनेर तालुका माहेश्वरी सभेच्या सत्र २०२३-२५ करीता अध्यक्ष म्हणून श्रीनिवास भंडारी यांची तर मंत्री पदी जुगलकिशोर बाहेती यांची बिनविरोध निवड झाली.
संगमनेर तालुका सभेची निवडणूक नुकतीच भंडारी मंगल कार्यालयात निवडणूक निरिक्षक रामनिवास राठी व सोमनाथ मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी प्रदेश जनसंपर्क मंत्री मनिष मणियार, अहमदनगर जिल्हाध्यक्ष अनिष मणियार, जिल्हा मंत्री तथा जिल्हा निवडणूक सहाय्यक अजय जाजू, संयुक्त मंत्री सतिषकुमार बाहेती, उद्योजक मनिष मालपाणी, गिरीश मालपाणी, प्रदेश सभेचे गणेशलाल बाहेती, सेवा निधीचे बसंतकाका मणियार, राष्ट्रीय युवा संघटन चे राहुल बाहेती आदी मान्यवर उपस्थित होते.
आरंभी संगमनेर तालुका सभेचे मावळते अध्यक्ष अतुल झंवर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी अतुल झंवर यांनी सत्रातील कार्याचा आढावा सादर केला. तर अर्थमंत्री श्रीनिवास भंडारी यांनी आर्थिक लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. त्यास सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिष मणियार यांनी माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ व जिल्हा सभा यांच्या माध्यमातून देणगीदारांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या योजनेत जिल्ह्यातील २२ गरजू मुलांना लॅपटॉप मोफत वितरीत केल्याचे सांगितले. याबाबत उपस्थितांनी जिल्हा सभेचे अभिनंदन केले. यावेळी मनिष मालपाणी, मनिष मणियार, गणेशलाल बाहेती, राहुल बाहेती, ओमप्रकाश जाजू , श्रीकांत मणियार आदींनी मार्गदर्शन केले.
संगमनेर मध्ये लवकरच महत्वाकांक्षी प्रकल्प – महासभा, प्रदेश सभेच्या विविध योजनांची माहिती जिल्हाध्यक्ष मणियार यांनी उपस्थितांना दिली. यावर चर्चा होऊन सर्वसामान्य परिवारासाठी लवकरच “महेश नगर” ची योजना संगमनेर मध्ये राबविण्याबाबत एकमत झाले. या योजनेचे प्रकल्प प्रमुख म्हणून मनिष मालपाणी यांनी जबाबदारी स्विकारली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मालपाणी अभिनंदन केले. तसेच या टीमने तालुका सभेच्या फंडात १ लाख २५ हजाराची केलेली वाढ, कोरोना काळ असतांनाही तंत्रज्ञानाच्या जोरावर घेतलेले भरीव कार्यक्रम आणि तालुका सभेने “महेश नगर” योजनेबाबत पुढाकार घेण्याचे जाहीर केले याबद्दल उपस्थितांनी नवनिर्वाचित टीमचे कौतुक केले. उपस्थितांचे आभार अर्थमंत्री श्रीनिवास भंडारी यांनी मानले.
यानंतर निवडणूक निरीक्षक यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. तेव्हा अध्यक्षपदासाठी श्रीनिवास भंडारी यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अन्य पदाधिकारी यांची देखील बिनविरोध निवड झाली. त्यात उपाध्यक्ष – संजय रा. मालपाणी, मंत्री – जुगलकिशोर बाहेती, सह मंत्री – जयप्रकाश भुतडा, अर्थमंत्री – सुजित खटोड, संगठण मंत्री – सचिन मणियार यांचा समावेश आहे. नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नावांची घोषणा निरिक्षक रामनिवास राठी यांनी केली.
श्रीनिवास भंडारी हे नेहमी सामाजिक संस्थंमध्ये कार्य करणारे व्यक्तिमत्व. आज “लायन्स सफायर” च्या सदस्यांनी भंडारी यांच्या निवडीचा आनंद फटाक्याची आतिषबाजी करून व्यक्त केला. यावेळी विविध मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.