निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना
संगमनेर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून त्यात संगमनेर तालुका युवा सेनेच्या प्रमुखपदी साकुरची बुलंद तोफ योगेश किसन खेमनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना शिवसैनिकातून व्यक्त होत आहे.
योगेश खेमनर यांनी यापूर्वी संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. टोल नाक्यावरील आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून साकुर पठार भागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फीच्या संदर्भातील विविध कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. साकुर ग्रामीण रुग्णालयातील गरजू पेशंटला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांनी मोलाची मदत केली आहे. रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत गरजांसाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून ते पठार भागातून पुढे आले आहे. कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले आहे. त्यांची नुकतीच संगमनेर तालुका युवा सेना प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यातून व्यक्त होत असून त्यांच्या काळात संगमनेर तालुक्यात युवा सेना अधिक बळकट होईल असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.