शिर्डी, दि.१७ मे २०२३ (उमाका वृत्तसेवा) – संगमनेर तालुक्यातील १५ मंडळामध्ये १७ मे २०२३ पासून ‘शासन आपल्या दारी’ शिबिरांच्या आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी एकाच छताखाली आले आहेत. या शिबिरात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात येऊन जागेवरच त्यांच्या कामाबाबतची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे .अशी माहिती संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत १७ मे रोजी संगमनेर, धांदरफळ शिबलापूर (आश्वी खुर्द), घारगाव व साकुर या मंडळात शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या नियोजनासाठी मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर समन्वयक अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी (पंचायत समिती) यांना नियुक्त करण्यात आले आहे. या शिबिराचे नियंत्रक अधिकारी म्हणून संगमनेर तहसीलदार काम पाहत आहेत.
‘शासन आपल्या दारी’ अभियानात १८ मे २०२३ रोजी समनापूर, आश्वी बुद्रुक, तळेगाव, डोळासने, पिंपरणे (जोर्वे) या मंडळस्तरावर शिबिर घेण्यात येणार आहेत. या शिबिरात पंचायत समिती गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता, कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, भूमी अभिलेख, पाणीपुरवठा, सहायक निबंधक, सामाजिक वनीकरण, गटशिक्षणाधिकारी, दूरसंचार विभाग, एकात्मिक बालविकास , पशुधन विकास अधिकारी, महावितरण आदी सर्व शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या दैनंदिन समस्या अडचणी जाणून घेतील व त्यांना योजनांची माहिती देतील. शक्य असेल तर त्या लाभार्थ्यांना जागेवरच लाभासाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. असे ही तहसीलदार श्री.मांजरे यांनी सांगितले.
००००