श्री.नाथ विद्या मंदिरची जनजागृती दिंडी
नगर – भारत हा एकमेव असा देश आहे की या देशात सण-उत्सव, परंपरेने नटलेला आहे. प्रत्येक सण हा आपल्या एकतेचे प्रतिक दर्शवितात. गणेशोत्सव, दिवाळी, होळी, ईद, नाताळ या सर्व सणांना विशेष महत्व आहे. संस्कृती व परंपरा जोपासण्याचे संस्कार हे बालवयातच होतात. दिंडी ही महाराष्ट्राची हजारो वर्षांची परंपरा आहे. या दिंडीचे महत्व मुलांनाही व्हावे, त्या मागील हेतू कळला पाहिजे. दिंडीची अखंडीत परंपरा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, असे प्रतिपादन उद्योजक संतोष गर्जे यांनी केले.
वसंत टेकडी येथील श्री.नाथ विद्या मंदिराच्या आषाढी दिंडींचा शुभारंभ संतोष गर्जे व सौ.स्वाती गर्जे यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाला. याप्रसंगी मुख्याध्यापिका अनिता सिद्दम, प्राचार्य भरत बिडवे, प्राचार्य संदिप कांबळे, मिनाक्षी यन्नम, संगीता शिंदे, देवीदास बुधवंत, पालक उपस्थित होते.
विविध संत, देव-देवतांच्या वेशभूषेतील मुले-मुली दिंडीत सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांच्या उत्साहाबरोबर पालकांचा व शिक्षकांचाही उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसत होता. शाळेत आपल्या पाल्यांवर होणारे संस्कार पाहून पालक देखील भावूक झाले होते.
या दिंडीमध्ये लेझिम पथक, पाऊली मुळे मोठ्या दिंडीप्रमाणे यावेळी चिमुकले फुगड्या,रिंगण सोहळा करीत परिसरातून बाल वारकर्यांनी पर्यावरणाचे महत्व, पाणी, बचत, बेटी बचाओ, मतदान जागृतीपर घोषवाक्य असलेले फलक हाती घेतले होते.
ही दिंडी निर्मलनगर येथील सिद्धेश्वर मंदिरात जाऊन विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा फेरी मारली. मंदिराच्या वतीने बबन नांगरे, शेखर आंबेकर, विठ्ठल आंधळे, बाळासाहेब पाटसकर, प्रभाकर गायकवाड, विश्वनाथ कुताळ, मंगल आंबिलवादे, मंगल खेडकर आदिंनी सर्वांना अल्पोपहार दिला.
लेझिम पथकासाठी संजय चौरे, मंगल कपाळे यांचे तर पाऊली करीता वर्षा कबाडी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी सुखदेव कापडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. शेवटी मुख्याध्यापिका अनिता सिद्धम यांनी आभार मानले.