संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यातून कोलमडलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्याची गरज असताना त्यावर दुर्दैवाने चर्चा होत नाही. अनावश्यक गोष्टीवर मात्र खूप चर्चा होते. त्यात भाषेचा स्तर इतका खालावलाय की सध्याच्या राजकीय चर्चेचा दर्जा आणि वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी असून आजच्या राजकीय चर्चा पाहून अक्षरशः लाज वाटत असल्याची खंत काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मतदान केंद्रावर भेटीसाठी आलेल्या माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्यासहित काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार थोरात यावेळी म्हणाले की, देशात असंख्य प्रश्न आज ‘आ’ वासून उभे आहेत. गेल्या काही काळात राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याकडे लक्ष देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन उभारी देण्याची गरज आहे. बेरोजगारी इतकी वाढली की, बेरोजगार तरुण गावोगावी हिंडतोय, महागाई प्रचंड वाढलेली आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या सामान्य माणसाशी निगडित आहेत मात्र त्यावर चर्चा होत नाही. मात्र अनावश्यक गोष्टीवर खूप चर्चा होते हा दोष कोणा एकाचा नसून त्यात सगळ्याच राजकारण्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. अनावश्यक चर्चा मधून अलीकडच्या काळात राजकारण्यांच्या बोलण्याचा स्तर अत्यंत खालावला असून त्याचा दर्जा पाहून अक्षरशः लाज वाटावी अशी स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगून आपण बोलतोय काय, आपल्या बोलण्याची पातळी काय, आपली भाषा काय, याचा विचार कोणी करीत नसल्याची खंत व्यक्त करीत या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणाऱ्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या राजकारणी ज्या भाषेत बोलतात हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. हा विचार आमच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रश्नावर आमदार थोरात म्हणाले की, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने राजकारण करीत असतो.राज्यांमध्ये मोठ्या कालखंडानंतर सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. पुढील काळात
नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकांना महत्व प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण हा त्याचाच एक भाग आहे, त्यामुळे स्वतःचा मतदारसंघ, जिल्हा म्हणून या गोष्टी सांभाळाव्या लागत असल्याने ही निवडणूक अटीतटीची लढाई असणे गैर नसल्याचे ते म्हणाले. बाजार समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र लढवत आहोत. राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.
चौकट :- आंदोलन सुरू झाले की प्रत्येकाची पळापळ होते. मंत्री येऊन भेटतात आणि आश्वासन दिले जाते. हे कायम होत असते. परंतु दिलेली आश्वासने पूर्ण करणे,ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आंदोलन कर्त्यांना केवळ आश्वासन देऊन चालत नाही तर त्यांच्या मागण्याबाबत कार्यवाही सुद्धा होणे तितकेच महत्त्वाचे असून दिलेली आश्वासने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी किसान सभेच्या लॉंग मार्च बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.