कोपरगाव : दि. ११ ऑक्टोंबर २०२३ –
सहकार क्षेत्रात साखर उद्योगात सातत्याने नाविन्यपुर्ण प्रयोग करून आधुनिकीकरणांची कास धरत उल्लेखनीय कार्य केल्याबददल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांस वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट यांच्यावतीने राज्य स्तरावरील सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, सहकारमंत्री दिलीपराव वळसे, महासंचालक संभाजीराव कडु यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व संचालक मंडळास मांजरी पुणे येथे गुरूवारी प्रदान करण्यांत आला.
कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सदरचा पुरस्कार संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व सभासद शेतक-यांना समर्पीत केला.
. विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी साखर उद्योगात आधुनिकीकरणाला महत्व दिले तोच धागा पकडुन सभासद शेतक-यांचे प्रती एकरी उस उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करत दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ केली. सभासद शेतक-यांच्या साथीने स्व. शंकरराव कोल्हे यांचीच शिकवण घेवुन आपण पुढे जात आहोत. वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट संस्थेने कारखान्याचा सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्काराने केलेला सन्मान मोठा आहे, बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत कारखाना आव्हान पेलण्यासाठी अधिकाधिक सक्षम करू असेही ते म्हणाले.
याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते, जयंत पाटील, जयप्रकाश दांडेगांवकर, हर्षवर्धन पाटील, नरेंद्र घुले, माजी महासंचालक शिवाजीराव देशमुख कारखान्याचे संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, बापूसाहेब बारहाते, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, ज्ञानेश्वर होन, ज्ञानदेव औताडे, निवृत्ती बनकर, संजय औताडे, विलासराव माळी, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार आदि उपस्थित होते.