प्रवरानदीच्या काठावर जोर्वे गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आपल्या जिद्दीने,कल्पकतेने व दुरदृष्टीने जनसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर केलेले काम येणाऱ्या कित्येक पिढीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिशा देणारे ठरले असून खऱ्या अर्थाने लोकसेवेचा वसा घेऊन आयुष्यभर सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यासाठी झगडणारे स्वातंत्रसैनिक भाऊसाहेब थोरात हे सहकार पंढरीचे वारकरी ठरले आहेत.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा शेतकरी कुटुंबात जन्म,जोर्वे गावी प्राथमिक शिक्षण,पुढे बोर्डिग मध्ये शिक्षण घेत असतांना त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावीत होऊन विद्यार्थी दशेतच वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. १९४२ च्या आंदोलनातील ब्रिटीशांविरुध्दच्या कारवायांमुळे त्यांना १५ महिने तुरुंगवास झाला मात्र या काळात डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचा सहवास व त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव भाऊसाहेबांवर पडला. १९४३ मध्ये सुटका झाल्यानंतर ही त्याच विचारांनी प्रेरीत झालेल्या भाऊसाहेबांनी महात्मा गांधींची ग्रामीण विकासाची संकल्पना घेवून आपले समाज विकासाचे कार्य सुरु केले.गोरगरिब,शेतकरी यांचे जिवनमान उंचविण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी संघटीत केले. त्यांच्यासाठी विविध मोर्चे,आंदोलने केली सोसायटीचे अध्यक्षपद ते राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपद हा त्यांचा सहकारातील प्रवास सर्वसामान्यांच्या उध्दाराचा राजमार्ग ठरला. त्याच काळात सरकारला सहकारात भाऊसाहेंबामुळे एक कायदाही पास करावा लागला. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी त्यांनी सहकाराचा मार्ग निवडला.स्व. यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील यांच्या विचारातून काम करतांना त्यांनी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. दुष्काळी भागात व अत्यंत माळरानावर प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेला हा कारखाना सहकारी कारखानदारीसाठी दिपस्तंभ ठरला.कमी प्रर्जन्यमान,सरकारी धोरणांचे अडथळे,आर्थिक अडचणी तरी ही दादांच्या दुरदृष्टीच्या आराखड्यातून उभा राहिलेला हा कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम ठरला आहे. ८०० मे टन ते ५५०० मेट्रीक टन क्षमता अशी दमदार वाटचाल करणाऱ्या या कारखान्याने शेतकरी व ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास जपतांना कायम उच्चांकी भाव दिला आहे. दादांची शिस्त, पारदर्शकता, आर्थिक काटकसर व आधुनिकता ही चतुःसूत्री अनेकांना सहकारात काम करताना मार्गदर्शक ठरली आहे. त्यांच्या ग्रामीण विकासाच्या पायाभूत आराखड्याची अनेक वेळा शासनाने ही दखल घेवून अंमलबजावणी केली आहे. कारखानदारी बरोबर पूरक उद्योग सुरु करतांना त्याकाळी सौरऊर्जेबाबद दाखविलेली दुरदृष्टी किती व्यापक व काळाची गरज ओळखून होती हे आज लक्षात येते. आर्थिक फायदा असला तर दारु उत्पादन करायचे नाही. हा त्यांचा दुढ निश्चय किती महत्चाचा ठरला शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे व समाजाचे स्वास्थ व आरोग्याचे भान जपणाऱ्या या नेत्याची समाजाबद्दल आपुलकीची भावना यामधून राज्याला कळाली. प्रत्येक कुटुंबाची काळजी वाहणारा नेता अशी ओळख त्यांनी आपल्या कर्तुत्वातून सिद्धध केली होती. ग्रामीण विकासासाठी सहकारातून दूग्धक्रांती घडवितांना गावोगावी दुध सोसायट्यांची निर्मिती केली. शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा निर्माण करुन अनेक कुटुंबामध्ये समृध्दी आणली. याच बरोबर सह्याद्री,अमृतवाहिनी या गुणवत्तेच्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या.आज अमृतवाहिनी शैक्षणिक संकुलनात इंजिनिअरींग, तंत्रनिकेतन,एम बी ए,फार्मसी,मॉडेल स्कूल, आय.टी.आय,इंटरनॅशनल स्कूल अशा वेगवेगळ्या महाविद्यालयातून सुमारे दहा हजार विद्यार्थी उच्च तंत्रशिक्षण घेत आहे.या संस्थेतील हजारो युवक देश विदेशात उच्च पदावर काम करत आहे. गावोगावी रस्ते,शाळा,बंधाऱ्यांचे जाळे असे अनेक विकासाचे कामे त्यांनी केली आहेत.याचबरोबर या संपूर्ण परिवाराने कायम समाजकार्याचे व्रत जपले आहे डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचे परिवारीक व गुरुशिष्याचे स्नेह जपत भाऊसाहेबांनी समाजाच्या विकासाचा, सामाजिक समतेचा, आर्थिक विकासाचा व पुरोगामी विचारांचा वारसा जपला. यामध्ये डॉ.अण्णासाहेब शिंदे,ॲड रावसाहेब शिंदे यांचे वैचारिक मार्गदर्शन मिळाले.हाच समृध्द वारसा राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,जावई आमदार डॉ.सुधीर तांबे,नातू आमदार सत्यजित तांबे यांनी सांभाळला आहे.त्यांची प्रेरणा व आशिर्वाद सदैव संपूर्ण राज्यातील सहकारावर व संगमनेर तालुक्यावर राहिले आहेत.
(चंद्रकांत शिंदे पाटील)