नगर – सिंधी बांधवांच्या चाळीस दिवसांच्या उपवासाचे पर्व (16 जुलै ते 24 ऑगस्ट) अर्थात ‘चालिहो साहिब’ची कालपासून मोठ्या उत्साहात, श्रद्धाभावाने सुरुवात झाली. सिंधी कॉलनी, तारकपुर येथील श्री झुलेलाल देव मंदिर येथील चालिहो व्रत आरंभनिमित्त आयोजित कार्यक्रमात पुज्य बहराणोसाहिबची पूजा सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष महेश मध्यान यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आरती अखो पल्लव तसेच भजने म्हणत उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी जनरल पंचायत कमिटीचे सुरेश हिरानंदानी, प्रदीप आहुजा, जयकुमार रंगलानी, रमेश तनवानी, सुनिल बजाज, विनोद कुकरेजा, रमेश कुकरेजा, भरत नवलानी, प्रेम बजाज, द्वारका किंगर, किशन पंजवानी, जयकुमार खुबचंदानी, लिलाराम खुबचंदानी, राजू बजाज, डॉ.टेकवाणी, कपिल किंगर, हरिश हरवानी, कुमार गाबरा आदि मान्यवरांसह जनरल पंचायत सल्लागार समिती सदस्य, उत्सव समिती सदस्य व झुलेलाल मंदिर समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरती प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ.संग्राम जगताप, नगरसेवक योगिराज गाडे, अजिंक्य बोरकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
या शिवाय सावेडी येथील सत्नाम साक्षी गो-शाळेत तसेच गुलमोहोर रोडवरील माता लालवारी झुलेलाल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी ‘चालिहो’ उत्सवास प्रारंभ करण्यात आला.
चालिहो विषयी अधिक माहिती देतांना सिंधी जनरल पंचायत समितीचे प्रसिद्धी प्रमुख किशोर खुबचंदानी म्हणाले की, ‘चालिहो’ नावाच्या या धार्मिक सणोत्सवाला सिंधी समाजात आगळे-वेगळे असे महत्व आहे. चालिहो सणाचा संबंध जलदेवतेशी आहे. सिंधी समाजात वरुण देवतेची पूजा प्राचिन काळापासून केली जाते. चालिहो हा वरुणदेवता झुलेलाल यांच्या पुजेशी संबंधित असून, भगवान झुलेलाल हे सिंधी समाजाचे इष्टदेव आहेत. चालिहो याचा अर्थ चाळीस दिवांसांचे व्रत, उपवास, पूजा इत्यादी. झुलेलालचे भक्त चाळीस दिवसांचा उपवास करतात. या काळात काही नियम पाळीत, वरुण देवतेची पूजा व स्तुती करण्यात येते. मंदिरात जाऊन सामुहिक प्रार्थनेद्वारे समस्त मानवजातीच्या कल्याणाची भावना व्यक्त केली जाते, असे शेवटी सांगितले.
सिंधी कॉलनी येथील श्री झुलेलाल मंदिरात पुढील चाळीस दिवस दररोज सायंकाळी बहराणोची पूजा, आरती, पल्लव नंतर हथप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, रात्री 8 ते 10 या वेळेत गायक बल्लू सचदेव यांचे भक्तीगीते, झुलेलाल चालिसाचा कार्यक्रम होईल. तरी भाविकांनी सर्व कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री झुलेलाल मंदिर समिती व सिंधी जनरल पंचायतच्यावतीने करण्यात आले आहे.