चांदेकसारे स्मशानभूमीत हजारोंचे डोळे पाणावले
कोपरगाव : भारत माता की जय, वीर जवान तू अमर रहे, वंदे मातरम अशा राष्ट्र घोषणा देत काल मंगळवारी सायंकाळी सहा वाजता कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सेवानिवृत्त शिक्षक आर पी होन यांचे सुपुत्र भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सुभेदार प्रमोदसिंह रावसाहेब होन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमात चांदेकसारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
चांदेकसारे पंचक्रोशीतून प्रमोदसिंह होन यांना अखेरचा निरोप देताना हजारोचे डोळे पाणावले.
सायंकाळी पाच वाजता पुणे इथून सुभेदार होन पार्थिव सैन्यदलातील जवानांच्या टीमने चांदेकसारे येथे आणले. होन यांना शेवटचा निरोप देताना गावातून शोभायात्रा काढण्यात आली. स्मशानभूमी येथे शासकीय इतमात मानवंदना देण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आ स्नेहलता कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने तर संचालक वसंतराव आभाळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे वतीने सुभेदार होन यांना श्रद्धांजली अर्पण केली. कोपरगावचे नायब तहसीलदार व महसूल विभागाची टीम,
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. पोलिसांच्या एका तुकडीने व सैन्य दलातील एका तुकडीने तीन रांऊड घेत सलामी देत बंदुकातून आकाशात फायरिंग केली. सुभेदार होन यांच्या पक्षात आई-वडील, पत्नी ,एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे. चांदेकसारे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अंत्यसंस्काराच्या ठिकाणी साफसफाई करत विशेष सुविधा पुरवण्यात आली.