यंत्रांच्या बरोबरीने बैलांना महत्व
कोपरगाव (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यांत्रिकीकरणाकडे वळालेल्या प्रक्रियेत बैलांचेही महत्व मात्र कमी झाले नसल्याचे चित्र यावेळी दिसून आले. सकाळपासूनच वरून राजाने हजेरी लावल्याने बैल पोळा शेतकऱ्यांनी आनंदात साजरा केला. यांत्रिकीकरणामुळे बैलांचे प्रमाण कमी झाले असले तरी सोनेवाडीकरांनी बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना विशेष महत्त्व देत त्यांची सन्मानाने मिरवणूक काढली.
दहे परिवारातील मनराज दहे व जावळे परिवारातील अर्जुन जावळे यांच्या सजवलेल्या बैलांना वेशीतून जाण्याचा पहिला मान मिळाला. दुपारी चार पासूनच शेतकरी व ग्रामस्थांनी आपली बैलांची सजावट करून हनुमान मंदिराच्या समोर बैलांना पूजेसाठी आणले होते. गावातील लहान व थोर मंडळींनी या बैलपोळ्यच्या उत्साहात सक्रिय सहभाग घेतला. बैलांच्या पाठीवर सर्जा राजा, शेतकऱ्यांना सुखी ठेव, भारत माता की जय असे आपापल्या मालकांनी बैलांच्या पाठीवर रंगवले होते. मारुती मंदिरासमोर गावातील नामांकित व्यक्तींच्या हस्ते पूजाअर्चा केल्यानंतर या बैलांना वेसीतून सन्मानाने पाठविण्यात आले.
वेशीतून मिरवणूक निघाल्यानंतर या बैलांचा घरोघरी जाऊन ग्रामस्थांनी सन्मान केला. सकाळपासूनच बैलपोळ्याच्या सणाच्या सजवटीसाठी शेतकऱ्यांनी दुकानासमोर गर्दी केली होती. आपल्या बैलांना मोरक्या, बाशिंगे झाली झालरी, छब्बी गोंडे , व पाठीवर व रंग रंगोली करून शिंगावर फुगे लावून बैलांना सजवले होते. गेलेला पाऊस पोळ्याला परत येत असतो ही म्हण या दिवशी खरी ठरली. सकाळपासूनच वरून राजाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. बैलांच्या समोर गावकऱ्यांनी नाचण्याचा आनंद लुटला.