कोपरगाव प्रतिनिधी : मराठी आपली मातृभाषा असून देखील आपल्याला मराठी बोलतांना अनेक अडचणी येतात. याचे कारण मराठी विषयी आपली उदासीनता हे होय. आपण आपल्या मातृभाषेपासून दिवसेंदिवस दूर जात आहोत. शासकीय मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत व खाजगी इंग्रजी माध्यामांच्या शाळांचा सुकाळ आहे. कोणतीही भाषा शिकतांना वाचन, लेखन व श्रवण कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे, भाषेचे वैभव कायम राखण्यासाठी ही कौशल्ये शिकणे क्रमप्राप्त आहे. उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम श्रोता बनावे लागेल” असे प्रतिपादन हिंदी व मराठी विषयाचे अभ्यासक, अनुवादक प्रो.(डॉ.) जिभाऊ मोरे यांनी केले आहे. के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” समारंभाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.प्रो.(डॉ.) विजय ठाणगे हे होते.
डॉ. मोरे पुढे म्हणाले की “आपल्याला आपली भाषा उत्तम तर्हेने बोलता आली पाहिजे. भाषा शिकायची असेत तर व्याकरणाबरोबरच आपला शब्दसाठाही वाढवला पाहिजे. अनुवाद आदी कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या नव्या संधी शोधल्या पाहिजेत. यासाठी आजच्या युवापिढीने अभासी दुनियेच्या विळख्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे.”
अध्यक्षीय समारोप करताना मा. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की “आपण प्रथमत: चांगले वाचायला शिकले पाहिजे, तरच आपण उत्तम बोलायला शिकू. त्यासाठी वर्तमानपत्रे, कथा, कादंबरी इ. साहित्य वाचणे गरजेचे आहे, साहित्य वाचल्याने आपण उत्तम बोलू शकतो, चांगले व्यक्ती म्हणून जगण्यासाठी वाचन करणे आणि सध्याच्या युगात स्पर्धा परीक्षांमध्ये टिकण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांचे महत्व नाकारून चालणार नाही.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. संपत आहेर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रावसाहेब गायकवाड यांनी केले, तर डॉ. संजय दवंगे यांनी आभार प्रदर्शन केले. या समारंभासाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेंचे बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, डॉ. नीता शिंदे, डॉ. सुरेखा भिंगारदिवे, डॉ. नितीन शिंदे, डॉ.वासुदेव साळुंके, प्रा. वर्षा आहेर, प्रा. मयुरी आहेर, डॉ.दिलीप बागुल, प्रा.किरण सोळसे, प्रा.प्रवीण मोरे, प्रा.विजय खंडीझोड, आदी प्राध्यापक वृंद उपस्थित होते.