कोपरगाव:
कोपरगाव शहरातील मुख्य चौकात महिला व पुरुषासाठी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधावे या मागणी साठी सर्व सामान्य नागरिक व बाजार पेठेतील व्यापारी यांच्या वतीने नगर पालिका आवारात सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहरात मूख्य रस्त्यालगत पुरुषांसाठी स्वच्छतागृहे होती मात्र विकास कामाच्या गदारोळात ही स्वच्छतागृहे नगर पालिकेने काढून टाकले. तसेच लोक शाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाच्या बाजूला असलेले स्वच्छता गृहा शेजारी नवीन इमारतीचा पाया खोदत असताना आठ दिवसापूर्वी पडले. मात्र त्यामुळे परिसरातील नागरिक व व्यापारी यांची मोठी हाल होत आहे. तसेच महिला करिता एवढ्या मोठ्या शहरात भाजी मार्केट मध्ये एकमेव स्वच्छता गृह आहे.
अनेक व्यापारी व नागरिक यांनी वारंवार नगर पालिके कडे स्वच्छता गृहाची मागणी केली. मात्र आठ दिवस झाले तरी नागरिक, व्यापारी यांच्या मागणीकडे नगर पालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असून कोपरगाव शहरातही महिला व पुरुषांना लघवी करण्यासाठी स्वच्छता गृह त्वरित बांधावे या मागणीसाठी कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने उद्या मंगळवार दि ९/५/२०२३ रोजी सकाळी ११ वा नगर पालिका आवारात प्रतिकात्मक “सामूहिक मूत्र विसर्जन” आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या आंदोलनात प्लास्टिक बाटली घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून या आंदोलनास शिव सेनेचे भरत मोरे, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे संतोष गंगवाल, शेतकरी कृती समितीचे तुषार विध्वंस, भूमी पुत्र फाउंडेशन चे निसार शेख, भोई समाज संघटनेचे अर्जुन मोरे व व्यापारी बांधव तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.