मुंबई : माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयानं एनआयएच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.एनआयएनं अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा सखोल तपास केला नसल्याचं दिसतंय असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि आरएन लड्डा यांच्या खंडपीठाने या सुनावणीदरम्यान म्हटलंय की, “24/25 फेब्रुवारी 2021 रोजी एका मोठ्या उद्योजकाच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. याप्रकरणी एनआयएनं ज्या प्रकारे पार्किंग कटाचा तपास केला, तो समाधनकारक झालेला नाही”.
एवढा मोठा कट नियोजनाशिवाय शक्य नाही, त्यात एकापेक्षा जास्त जण असण्याची शक्यता जास्त आहे, असं मत उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं व्यक्त केलं आहे.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यासोबत स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या काड्या ठेवण्याचा कट कोणी रचला, यावर एनआयए मौन बाळगून असल्याचं खंडपीठानं नमूद केलं.