अंभोरे येथे निवडणुकीच्या वादातून विजयी उमेदवारासह ५ जणांना जबर मारहाण ; १८ जणांवर गुन्हा दाखल  

0

संगमनेर : तालुक्यातील अंभोरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नारायण खेमनर हे निवडून आल्याने, तू कसा निवडून आला, तुझ्याकडे पाहून घेतो अशी दमदाटी व शिवीगाळ करत १८ जणांनी ५ जणांना काठी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. हि घटना मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास  तालुक्यातील अंभोरे येथील शिकारे वस्तीवर घडली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

           तालुक्यातील ३७ ग्रामपंचायती सोबत अंभोरे ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून या गावात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि राज्याचे विद्यमान महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोन गटात वाद सुरु होता. निवडणुकीच्या उमेदवारांच्या छाननीच्या वेळी देखील या दोन गटात तहसील प्रांगणात वाद पाहायला मिळाला होता. त्यावेळी तहसीलदार अमोल निकम यांनी वाद मिटवले होते. मात्र, या दोन्ही गटात खदखद कायम होती. तिचे रूपांतर मंगळवारी निकालाच्या दिवशी तुंबळ हाणामारीतून झाले. नारायण खेमनर ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याने गावातील मारुती मंदिरासमोर उभे होते. तेथे श्रावण खेमनर व प्रकाश खेमनर यांनी येऊन विजयी उमेदवार नारायण खेमनर यांना दमदाटी व शिवीगाळ केली. त्यानंतर  कोमल शरद  खेमनर, शरद खेमनर, नारायण खेमनर, सहादू दामू खेमनर व राधु दामू खेमनर जनावरांना चारा आणण्यासाठी संपत गोविंद खेमनर यांचे घरासमोरून जात असताना १८ जणांच्या जमावाने त्यांना आडवले. नारायण खेमनर निवडून आल्यावरून त्यांच्यासह ५ जणांना या १८ लोकांनी लाथा बुक्क्यांनी व काठीने जबर मारहाण केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड आपल्या ताफ्यासह वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने वादावर पडदा पडला. याप्रकरणी कोमल शरद खेमनर यांच्या फिर्यादीवरून श्रावण गोविंद खेमनर, प्रकाश गणपत खेमनर, संपत गोविंद खेमनर, सचिन संपत खेमनर, अक्षय श्रावण खेमनर, अशोक गोविंद खेमनर, गणपत गोविंद खेमनर, अजय अशोक खेमनर, योगेश संपत खेमनर, अभय श्रावण खेमनर, ज्योतिबा नामदेव जगनर, पंढरीनाथ गंगाराम वाघमोडे, नारायण गंगाराम वाघमोडे, मंगल संपत खेमनर, गोविंद सखाराम खेमनर, सविता अशोक खेमनर, दिपाली प्रकाश खेमनर, अनुराधा सचिन खेमनर (अंभोरे) आदी १८ जणांवर विविध कलमान्वये तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल शेख करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here