कोपरगाव:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील विद्यार्थी श्री. अक्षय मधुकर आव्हाड याला नुकताच महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील वर्ष २०२१-२२ चा प्रतिष्ठेचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ मा.राज्यपाल श्री. रमेश बैस व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्राप्त झाला. अक्षय हा के.जे.सोमैया (वरिष्ठ) महाविद्यालयातील क्रीडा विभागाचा विद्यार्थी असून क्रीडा क्षेत्रातील त्याचे योगदान महत्वाचे आहे. त्याने राष्ट्रीय पातळी वर बेसबॉल स्पर्धेचे नेतृत्व केलेले असून ध्येय, चिकाटी व परिश्रम या त्रिसूत्रीचा प्रयोग करून हे दैदिप्यमान यश मिळविलेले आहे. त्याने पुरस्काराच्या रूपाने मिळविलेल्या या अद्भुतपूर्व यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने आज गुरूवार दिनांक. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता कोपरगांव शहरात भव्य गौरव-यात्रा काढण्यात आली. यावेळी कोपरगाव शहरातील महात्मा गांधी स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहरात अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्ष तसेच मान्यवर व शैक्षणिक संस्थानी अक्षयचा औक्षण करून भव्य सत्कार केला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या गौरव यात्रेत उपस्थित विद्यार्थ्यांचा सहभाग नेत्रदिपक असा होता. त्यांनी दिलेल्या प्रेरणादायी घोषणाबाजीने परिसर दुमदुमुन निघाला. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री.अक्षय यांच्याबरोबर गौरव यात्रेच्या रथावर कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, विश्वस्त मा. सुनील बोरा, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सुनिल कुटे यांच्या समवेत अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या प्रेरणादायी उपक्रमांमध्ये क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग प्रेरणादायी होता. ही गौरव यात्रा यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र बनसोडे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे व महविद्यालयातील प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.अक्षय आव्हाड याची’शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल कोपरगाव शहरात भव्य गौरव-यात्रा..