अखेर ग्रामसेवक राजेंद्र वळेकर निलंबित, तिसर्‍या दिवशी उपोषण मागे… 

0

जामखेड तालुका प्रतिनिधी :

जिवंत व्यक्तीला मयत दाखवणाऱ्या ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी गेल्या तीन दिवसांपासून जामखेड तहसील कार्यालयात उपोषण सुरु होते. आज सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दोषी ग्रामसेवक राजेंद्र वळेकर यांच्या निलंबणाचा आदेश काढला यामुळे तिसऱ्या दिवशी लाभार्थी यांचा मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी आपले उपोषण मागे घेतले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबणाच्या आदेशात म्हटले आहे की, राजेंद्र बन्सीधर वळेकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत साकत, नान्नज, जायभायवाडी तालुका जामखेड येथे कार्यरत असुन त्यांनी त्यांचे कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केलेला आहे. त्यांना या त्यांचे गैरर्तनात सुधारणा करण्याची संधी देऊनही त्यांचे वर्तनात सुधारणा झालली नाही. 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने सदैव निरपराद सचोटीने वागणे व कर्तव्यपरायण असणे आवश्यक व बंधनकारक आहे. तथापी राजेंद बन्सीधर वळेकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत साकत, नान्नज, जायभायवाडी यांनी ग्रामपंचायत कार्यालयीन कामी गैरवर्तन करुन कर्तव्याचे पालन न करता महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चा नियम ३ चा भंग केलेला आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम क्र.३ (१) अ मध्ये दिलेल्या तरतूदीस अधीन राहून मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मी मुख्यकार्यकारी अधिकारी तथा शिस्त विषयक प्राधिकारण जिल्हा परिषद अहिल्यानगर या आदेशाव्दारे राजेंद्र वन्सीधर वळेकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत साकत, नान्नज, जायभायवाडी तालुका जामखेड यांचे विरुध्द शिस्त विषयक कार्यवाही अनिर्णित असल्याने यांना सदरचा आदेश बजावलेच्या दिनांका पासून जिल्हा परिषद सेवेतून ग्रामपंचयत अधिकारी या पदावरून सेवा निलंबीत करीत आहे.

असाही आदेश देण्यात येत आहे की, हा आदेश अंमलात राहील तेवढया कालावधीत राजेंद्र बन्सीधर वळेकर ग्रामपंचायत अधिकारी यांचे मुख्यालय पंचायत समिती श्रीगोंदा येथे राहील त्यांना सेवा निलंबन कालावधीत देण्यात आलेल्या मुख्यालयाचे गटविकास अधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

राजेंद्र बन्सीधर वळेकर ग्रामपंचायत अधिकारी यांना महाराष्ट्र नागरासेवा (पदग्रहण अवधी स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ मधील नियम ६८ च्या तरतूदी नुसार निलंबन भत्ता व पुरक भत्ते देण्यात यावेत. निलंबनाच्या कालावधीत  राजेंद्र  वळेकर ग्रामपंचायत अधिकारी यांनी खाजगी नोकरी स्विकारु नये. त्यांनी तसे केल्यास त्या बाबतचे पुरवणी दोषारोप त्यांचेवर ठेवण्यात येईल तसेच ते सेवानिलंबन निर्वाह भत्ता गमविण्यास पात्र ठरतील.

सेवानिलंबनाचे कालावधीत राजेंद वळेकर ग्रामपंचायत अधिकार्‍यांना सेवानिलंबन निर्वाह भत्ता जेव्हा जेव्हा देण्यात येईल. त्या त्या वेळी त्यांनी कोणतीही खाजगी नोकरी स्विकारली नाही. अथवा कोणताही खाजगी धंदा व व्यवसाय करीत नाही. अशा आशयाचे प्रमाणपत्र सेवा निलंबित कालावधीत दिलेल्या संबधीत गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना सादर करावे.

राजेंद्र वन्सीधर वळेकर ग्रामपंचायत अधिकारी यांना सेवा निलंबन कालावधीतील निर्वाह भत्ता नियमाप्रमाणे अदा करण्याची कार्यवाही या आदेशान्वये सेवा निलंबीत केलेनंतर त्यांना दिलेल्या मुख्यालय तालुक्याचे गटविकास अधिकारी पंचायत समिती हे करतील या आदेशाची नोंद राजेंद्र बन्सीधर वळेकर ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मूळ सेवापुस्तकामध्ये घेण्यात यावी आसा लेखी आदेश काढण्यात आला आहे. या आदेशाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उपोषण सोडतेवेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव, विस्तार अधिकारी कैलास खैरे, प्रहारचे तालुका अध्यक्ष नय्युम सुभेदार , सुनील केकान, माजी सरपंच एकनाथ जायभाय, नानासाहेब जायभाय, विठ्ठल मुंडे, रामकिसन जायभाय, रघुनाथ केकान, भारत जायभाय, शांतीलाल जायभाय, राजेंद्र जायभाय, मधुकर जायभाय, बाबुराव जायभाय, अजित जायभाय, नितीन जायभाय उपस्थित होते. 

तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले असले तरी व दोषी ग्रामसेवक निलंबित करण्यात आले असले तरी यातील दोषी सरपंच व ठरावावर अनुमोदक व सूचक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी कायदेशीर लढा चालूच ठेवणार असे उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी सांगितले. 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला होता पाठिंबा

जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथे प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेतील लाभार्थी भुजंग जायभाय हे जिवंत असूनही ग्रामपंचायतीच्या ठरावात ग्रामसेवक राजेंद्र वळेकर व सरपंचानी मयत दाखवण्याचा प्रताप केला आहे. याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी लाभार्थी यांचा मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर दि. २४ मार्च रोजी प्रत्यक्ष आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष विनोदसिंग परदेशी व तालुका अध्यक्ष नय्युम सुभेदार यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन उपोषणास पाठिंबा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here