नवी दिल्ली: शरद पवार यांनी आपल्या गटाची दिल्लीमध्ये बैठक घेतली. यामध्ये सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, वंदना चव्हाण, सोनिया दुहान, धीरज शर्मा, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैसल, एस के कोहली, योगानंद शास्त्री, व्ही. पी. शर्मा उपस्थित होते.
पक्ष फोडणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी दिला आहे. आम्ही जनतेमध्ये जाणार असून जनतेवर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले. खासदार प्रफुल्ल पटेलआणि सुनिल तटकरे यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्यात आलं असून तशी घोषणा दिल्लीतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर करण्यात आली. तसेच ज्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय बैठकीत आज आठ प्रस्ताव पारित करण्यात आले आहेत. जर राष्ट्रवादीच्या विचारधारेच्या विरोधात कुणी जात असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकाररिणीचा शरद पवारांवर पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवार म्हणाले. त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडू असं शरद पवारांनी माध्यमांना सांगितलं.