अतिवृष्टीग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

0

आमदार रोहित पवार यांचे महसूलमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांना पत्र

जामखेड तालुका प्रतिनिधी .–  जामखेड तालुक्यातील खर्डा व मोहरी भागात झालेल्या ढगफुटीमुळे पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले आहे.  या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी गावातील नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मंत्र्यांना दिले आहे.

मतदारसंघातील प्रत्येक नैसर्गीत आपत्तीच्या वेळेस आमदार रोहित पवार हे पंचनामे आणि नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करत असतात. यापूर्वीही त्यांनी याप्रकारे अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली आहे. जेव्हा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांना मिळावे यासाठी आमदार रोहित पवार पाठपुरावा करत आहेत. पिक विम्यासाठी देखील त्यांनी पाठपुरावा केलाच होता आणि जेव्हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा त्यांनी स्वखर्चातून टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याची सोय केली होती. त्यानुसारच खर्डा आणि मोहरी भागात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने या भागातील शेतीचे, पिकांचे आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी पंचनामे करणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांना निवेदन दिले. 

दरम्यान, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जामखेड-नगर महामार्गावरील बाफना पेट्रोल पंपाशेजारील पुलावरून पावसाचे पाणी वाहिल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आमदार रोहित पवार यांनी तत्परता दाखवत यंत्रणेला सांगून रात्रीतून ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरूळीत केली. 

चौकट 

‘‘खर्डा आणि मोहरी भागात ढगफुटी झाल्याने येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी सरसकट पंचनामे करण्यासंदर्भात पालकमंत्री आणि मदत व पुनवर्ससनमंत्री यांची भेट घेतली. त्यांनीही तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. याबाबत शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये.’’

रोहित पवार : आमदार, कर्जत-जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here