अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान तातडीने वर्ग करा.. शंकरराव चव्हाण

0

कोपरगाव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यात खरिपाच्या सोयाबीन मका फळबागा अदी पिके अतिवृष्टीच्या पावसाने जमीन दोस्त झाली होती. महाराष्ट्र राज्य सरकारने या पिकांचे पंचनामा करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पंचनामे झाले. मात्र अजूनही तालुक्यातील 70 टक्के शेतकऱ्यांना नुसकानीचे अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेचा अंत न पाहता प्रशासनाने तातडीने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे  अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करावे अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक शंकराव चव्हाण यांनी केली आहे.

हंगामामध्ये जवळपास तीन महिने तालुक्यात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन मका कापूस व फळबागे जमीनदोस्त  होऊन त्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाला शासनाने तातडीने या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे दोन्ही विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात थेट जात नुकसानीचे पंचनामे केले. या गोष्टीला तब्बल नऊ महिने उलटून गेले. महाराष्ट्र राज्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जाहीर केले. नुकसान भरपाईची रक्कम देखील महाराष्ट्र शासनाने प्रशासनाकडे वर्ग केली गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचे अनुदान जमा जमा होणार असल्याचे मेसेज व्हायरल झाले. 30 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली मात्र अजूनही 70 टक्के शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. वेगवेगळ्या बँकेचे खाते आधार कार्ड प्रत्येक गावच्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतींच्या पातळीवर दिलेले आहे. आज अनुदान येईल उद्या अनुदान येईल या आशेवर ग्रामीण भागातील शेतकरी बँकेचे उंबरठे झिझवत आहे मात्र अजून अनुदान जमा झालेले दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचे अनुदान जमा करावे अशी मागणी काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here