कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२-२०२३ ची रक्कम २५ जुलैपर्यंत जमा न केल्यास ३१ जुलै पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार कोपरगाव यांना कोपरगाव कृती समितीने निवेदनाद्वारे दिला आहे.
आपल्या निवेदनात समितीने म्हटले आहे की कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात साल २०२२ ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन. मका, ऊस, कांदा तसेच कपाशी व इतर सर्व पिकांचे नुकसान झालेले होते त्या दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने दिनांक १०/८/२०२२ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून नुकसान भरपाई मिळावी ह्यासाठी निर्णय घेतला व पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने दिनांक ०८/०९/२०२२ रोजी निर्णय घेण्यात आला व प्रसारित करण्यात आला (सी.एल.एस.-२०२२/प्र.क्र.२९७/म-३) नुसार SDRF नुसार देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या निकषामध्ये बदल करून त्यात वाढ करण्यात आली. त्यामुळे सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा निर्माण झाली होती. सध्या खरिपाच्या पेरण्यांनी वेग पकडलेला असून व शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकांना अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बियाणे व खते इत्यादी घेण्यासाठी चिंतेत असून वरील प्रमाणे राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्यास त्यास खरीप हंगामासाठी बियाणे व खते घेण्यास आर्थिक मदत होईल.
२५ जुलै २०२३ पर्यंत सर्व शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत त्यांच्या खात्यात वर्ग न केल्यास दिनांक ३१ जुलै पासून कोपरगाव तहसील कार्यालयाबाहेर कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीनुकसान भरपाई प्रत्यक्ष्यात मिळेपर्यंत बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा तहसीलदार कोपरगाव यांना कोपरगाव कृती समितीने निवेदनाद्वारे दिला आहे.
ह्यावेळी जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, शिवसेना (उ.बा.ठा.) तिरोडा संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी सरचिटणीस नितीन शिंदे, किसान कॉंग्रेसचे विजय जाधव, शेतकरी तुषार विद्वांस तसेच कोपरगाव बिग बागायतदार सोसायटीचे सदाशिव(बाबा) रासकर. अनिलराव शेवते, नरेंद्र(आबा)गिरमे, हेमंत गिरमे, कैलास देवकर, आदी उपस्थित होते प्रशासनाच्यातर्फे नायब तहसीलदार यांनी निवेदनाचा स्वीकार केला.