संगमनेर : संगमनेर शहरातील बहुतांश हॉस्पिटल नियमबाह्य व अनधिकृत असून यापूर्वी छावा संघटनेने केलेल्या उपोषणा दरम्यान संगमनेर नगरपालिकेने तपासणी केली या तपासणीत जे हॉस्पिटल नियमबाह्य व अनधिकृत आहेत त्यांच्यावर मात्र अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने नगरपालिका प्रशासनाविरोधात पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी दिला आहे. संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पीटलस् असून किती हॉस्पीटलस् अनाधिकृत, आधिकृत पद्धतीचे आहेत याची माहिती नगरपालिकेकडे नसल्याने शहरात किती ढिसाळ कारभार सुरू आहेे याची प्रचिती येते. यासाठी छावा संघटनेच्या वतीने नियमबाह्य, अनाधिकृत, बोगस हॉस्पिटल विषयी माहिती देऊनही नगरपालिका प्रशासन यावर कारवाई करण्याचे नााव घेत नाही. मोठया इमारती मधून अनेक हॉस्पीटलस् शहरात कार्यरत असून मंजूर बेड संख्या पेक्षा प्रत्यक्षात बेड जास्त आहे. ना हरकत दाखला व हॉस्पिटल परवानगी देताना उपलब्ध असणारी साधनसामग्री तपासणी करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे तर हॉस्पिटलची सहा महिन्यातून एकदा तपासणी करण्याची जबाबदारी जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची आहे, परंतु हे सर्व अधिकारी अशा हॉस्पिटलवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे प्रवीण कानवडे यांनी सांगितले. तसेच अनधिकृत व नियमबाह्य हॉस्पिटलवर नगरपालिका प्रशासनाने कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास येथील जबाबदार अधिकाऱ्यांची देखील तक्रार नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे कानवडे यांनी सांगितले. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रुग्णांची आशा हॉस्पीटल मधून लुट झाल्याचे चित्र दिसले, ग्रामिण भागातील सर्व सामान्य माणुस आजारपणात शहराकडे धाव घेतो मात्र येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना विविध आजारांची भीती दाखवून त्यांची लुट केली जात आहे. अधिकृत आणि अनधिकृत हॉस्पिटल्स यांचा ताळमेळचं दिसत नसल्याने यांची चौकशी करून नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी अन्यथा पुन्हा छावा संघटनेला उपोषण करावेे लागेल असाा इशारा प्रविण कानवडे यांनी दिला आहे .