मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 1 वर्ष, 1 महिना आणि 27 दिवसांनंतर ऑर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे.
“मला खोट्या आरोपात गोवण्यात आलं. परमबीर सिंहांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप केला. त्याच परमबीर सिंहांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिलं की हे आरोप ऐकीव माहितीवर होते. माझ्याकडे कोणताही पुरावा नाही असंही त्यांनी सांगितलं”, असं अनिल देशमुख यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर सांगितलं.
न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला. त्यासाठी मी आभार मानतो असंही देशमुख म्हणाले.
“देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. 14 महिने त्यांना खूप त्रास झाला. त्यांची तब्येत खराब झाली. 21 महिन्यांपासून खोट्या आरोपांमुळे कुटुंबाला त्रास झाला. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता, राहील. सगळ्या कोर्ट्सच्यावर एक कोर्ट असतो देवाचा तिकडे न्याय मिळेल. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून प्रचंड भारावून गेलो आहोत”, असं देशमुख यांच्या घरच्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. पुढे त्यांनी राजीनामा दिला आणि EDने त्यांना अटक केली.
फेब्रुवारी 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी गाडी आढळून आली होती. तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण विधानसभा अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर राज्यासह देशाचं लक्ष याकडे वेधलं गेलं. त्यानंतर घडलेल्या घडामोडींमधून अँटिलिया स्फोटक प्रकरणाचे धागेदोरे सुरुवातीला मुंबई पोलिसांतील गुन्हे शाखेतील अधिकारी सचिन वाझे, पुढे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि नंतर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. अखेरीस वाझे यांचं निलंबन-अटक, सिंह यांची बदली-गयब आणि देशमुख यांच्या राजीनामा ते अटक या घडामोडींनी हे प्रकरण गाजलं होतं.