संगमनेर : शेती क्षेत्र हे निसर्गावर अवलंबून आहे,अशा परिस्थितीमध्ये अन्न प्रक्रिया क्षेत्रात मोठी संधी असून महीलांनी फळप्रक्रिया उद्योगाकडे वळून उद्योजक व्हावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषि महाविद्यालय,जनसेवा फौंडेशन यांच्यावतीने आश्वी येथे फळ प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मीती या विषयांवर आयोजित कार्यशाळेत सौ. विखे पाटील बोलत होत्या. संस्थेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय कृषि, अन्न विश्लेषण व संशोधन संस्था, बाणेर पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ओसवाल, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अँड रोहीणीताई निघुते, कांचनताई मांढरे,संस्थेच्या कृषि संचालिका डॉ. शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ. किरण गोंटे, डॉ. विशाल केदारी, डाॅ.निलेश दळे,आश्वी महाविद्यालयाचे संचालक डॉ. राम पवार आदीसह आश्वी परिसरातील बचत गटांतील महीला उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या राज्यशासन आणि केंद्र सरकार फळप्रक्रिया आणि अन्न प्रक्रिया यासाठी प्राधान्य देत आहे. अर्थसंकल्पातही अन्न प्रक्रिया तसेच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगास प्राध्याने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फळ प्रक्रियाच्या माध्यमातून स्टार्ट अँप साठी प्रयत्नशील आहे. या संधीचा फायदा येणा-या काळात महीलांनी घेऊन केवळ उत्पादनच नव्हे तर प्रक्रिया, बाजारपेठ यांतून मुल्यसंवर्धनाची गरज व्यक्त करत महिलांच्या विविध प्रक्रिया पदार्थाना आज महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फौंडेशनने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. प्रवरेत सुरू झालेल्या अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाद्वारे वेळोवेळी महीलांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगतांनाच सध्या प्रत्येकाने निरोगी आरोग्यासाठी सेंद्रीय भाजीपाला, फळे घ्यावी भेसळयुक्त पदार्थ आणि दूध ग्राहकांना विकून पाप करू नये असे ही त्यांनी सांगितले.
विनय ओसवाल यांनी अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी, वित्त पुरवठा,शासकीय योजना, बाजारपेठ, शासकीय अनुदान, प्रकल्प आराखडा आदींची माहीती दिली. फळे – भाजीपाला प्रक्रिया याविषयी प्रा. विशाखा देवकर यांनी तर दुग्ध जन्य पदार्थ निर्मीती यांवर डॉ. दिपाली तांबे यांनी प्रात्याक्षिकांतून माहीती दिली. प्रारंभी डॉ. शुभांगी साळोखे यांनी कार्यशाळेचा उद्देश विशद केला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रा. रमेश जाधव यांनी मानले.
प्रवरेत सुरु झालेले अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय हे महीलांसाठी मोठी संधी असणार आहे. यातून या भागात अन्न,फळे,अन्न प्रक्रिया आदी फळप्रक्रिया क्षेत्राला चालना मिळेल. दुधात भेसळ करून जनतेच्या आरोग्याशी खेळू नये असेही सौ. विखे पाटील म्हणाल्या.