आ.रोहित पवार यांनी केली होती मागणी
जामखेड तालुका प्रतिनिधी
अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागमठाण व मांदळी या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास करण्याच्या कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मागणीची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दखल घेतली आहे. याबाबत धोरणात्मक निर्णयानुसार आणि सुरक्षिततेचा विचार करुन पुढील प्रक्रिया करण्याच्या सूचना ‘केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालया’च्या तांत्रिक सल्लागारांनी ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’च्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांविषयीच्या विविध मागण्यांबाबत आमदार रोहित पवार यांनी गेल्या महिन्यात नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या अहिल्यानगर-करमाळा महामार्गावर अंडरपास किंवा ओव्हरपास बनवणे, स्थानिक नागरिकांना टोलमाफी देणे, मतदारसंघात ड्राय पोर्टची स्थापना करणे, ग्रीनफिल्ड कॉरीडॉरचं काम तसेच माही जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी केली होती. याबाबत गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करुन त्यांनी या मागणीची पत्रेही दिली होती.
कर्जत तालुक्यातील नागमठाण व मांदळी ही दोन्ही गावे अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर आहेत. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात अनेक धार्मिक व अध्यात्मिक स्थळे असल्याने या दोन्ही गावांमध्ये प्रवाशी यात्रेकरुंची नेहमीच गर्दी असते. याशिवाय विद्यार्थी, शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिक यांना तर दैनंदिन कामासाठी सततच हा महामार्ग ओलांडावा लागतो. यावेळी अपघात होऊन जिवीत हानी होण्याची भीती असते. म्हणून हा मार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा यासाठी नागमठाण आणि मांदळी या दोन्ही गावाच्या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास बनवण्याची आग्रही मागणी रोहित पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली होती. तसेच मतदारसंघातील शेतकरी, विद्यार्थी, व्यावासायिक या स्थानिक नागरिकांना दररोज प्रवास करावा लागतो. त्यामुळं मतदारसंघातील १५ ते २० किलोमीटर अतंरावर राहणाऱ्या नागरिकांसाठी टोलमधून माफी देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची मागणीही रोहित पवार यांनी केली होती. त्यानुसार टोलच्या मागणीबाबत धोरणात्मक निर्णयानुसार पुढील प्रक्रिया करण्याच्या तर अंडरपास किंवा ओव्हरपास बनवण्याच्या मागणीसंदर्भात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाच्या तांत्रिक सल्लागारांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने नेहमीच संवेदनशीलपणे निर्णय घेतले आहेत. माझ्या मतदारसंघातील स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नागमठाण आणि मांदळी येथे अंडरपास किंवा ओव्हरपास बनवण्याच्या मागणीचीही त्यांनी तत्काळ दखल घेतली. याबद्दल त्यांचे मनापासून आभार! त्यांच्या विभागाकडून पुढील योग्य ती कार्यवाही तातडीने होईल आणि स्थानिकांच्या जीविताला किंवा खिशाला झळ लागणार नाही, असा विश्वास आहे
– *रोहित पवार*
*(आमदार, कर्जत-जामखेड)*