कोपरगाव : आजच्या लोकशाहीच्या तत्वाचा पाया महात्मा बसवेश्वरांनी १२ शतकातच घालून देत समानतेचे तत्व त्यांनी अमलात आणले होते.त्यांच्या या समानतेचा उल्लेख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आपल्या शपथविधीच्या वेळी केला . तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये समानतेचे प्रतीक म्हणून बसवेश्वर महाराजांचा उल्लेख करतात. असे प्रतिपादन पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले. कोपरगाव तहसील कार्यालयामध्ये महात्मा बसवेश्वरांची ८९२ वि जयंती साजरी करण्यात आली .त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार आशुतोष काळे , तहसीलदार विजय बोरुडे , संदीप वर्पे ,सुनील गंगुले आदी उपस्थित होते. कोयटे पुढे म्हणाले की आजच्या समाजालाही अवघड वाटणारा महिला पुनर्विवाहाचा पुरस्कार बसवेश्वरांनी त्याकाळी केला . त्याचप्रमाणे महिलांना समान आणि शिक्षणाचा अधिकार त्यांनी दिला , त्याकाळी त्यांनी समाजातील अनेक अनिष्ट चाली रीती , रूढी परंपरा झुगारून देत समाजाला लिंगायत रुपी स्वाभिमानाने जगण्यासाठी धर्म दिला . “तुमचा देह हाच तुमचा परमेश्वर आहे .त्याकरिता कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही.” अस्पृश्यता निवारण करताना ज्या समाजाला त्या काळी मंदिर प्रवेश दिला जात नव्हता त्याकरिता तुमच्या आणि देवाच्या कोणीही मध्यस्त नको म्हणून तो देवच लिंगरूपी आमच्या गळ्यात दिला .
अशा या थोर आद्य समाजसुधारक महात्म्याची जयंती शासकीय पातळीवर साजरी व्हावी अशी मागणी आपण अखिल लिंगायत समाजाचे अध्यक्ष असताना नांदेड येथील अधिवेशनात समाजबांधवांच्या वतीने केली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही ती तात्काळ मान्य करून २००० सालापासून साजरी करण्यास सुरवात केली. अशी आठवण काका कोयटे यांनी यावेळी सांगितली . तसेच आमदार आशुतोष काळे यांनी प्रत्येक अल्पसंख्याक समाजाकरिता प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी दिला . त्याबद्दल आभार व्यक्त केले. त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांचे स्मारकाची जागा अद्याप ताब्यात मिळालेली नाही . ती जागा मिळून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी काका कोयटे यांनी यावेळी केली.
अल्प संख्याक समुदायाच्या दर्जासाठी आजही लढा द्यावा लागतो याही खंत वाटते.
देशभरात लिंगायत समाज विखुरलेल्या स्वरूपात आहे. समाजाचे आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्याकरिता लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाज दर्जा मिळावा हि आमची मागणी आहे. २०१५ साली खा. शरद पवार यांनी या मागणीस जाहीर पाठिंबा दिला , त्याकरिता समाजाने अनेक आंदोलन केली ,मोर्चे काढले . त्यावर राजकीय आश्वासने मिळाली परंतु अद्याप त्यास मान्यता मिळाली नसल्याची खंत काका कोयटे यांनी व्यक्त केली . त्याचबरोबर जो पर्यंत लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील असा निर्धारही कोयटे यांनी व्यक्त केला . कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रदीप साखरे यांनी केले . यावेळी समाजातील भालचंद्र विभुते ,शिवकुमार सोनेकर, गिरीश सोनेकर शिवकुमार घोडके ,सतीश नीलकंठ, दिगंबरअप्पा भुसारे, सौ रजनीताई भुसारे, आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.