संगमनेर : तब्बल सात महिन्यापूर्वी खचलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलाची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर या परिसरातील संतप्त महिला, शालेय विद्यार्थी आणि सजग संगमनेरकरांनी खचलेल्या पुलानजीक नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जन आक्रोश आंदोलन केले. यावेळी आठ दिवसात पुलाच्या कामास सुरुवात न केल्यास नगरपालिकेवर मोर्चा नेणार असल्याचा इशारा संगमनेर तालुका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुुख तथा नगरपालिकेचे माजी नगरसेवक कैलासशेठ वाकचौरे आणि आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.
श्री.स्वामी समर्थ मंदिर ते श्री.साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील पूल गेल्या सहा-सात महिन्यापूर्वी खचल्याने या परिसरात जाणाऱ्या येणाऱ्या महिला,शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेशी पत्रव्यवहार करून पूल दुरुस्तीची मागणी केली. त्यानंतर पालिकेने या पुलाजवळ दुसरा छोटा पूल तयार केला परंतु तो पूर्ण वाहतुकीस उपयोगी पडत नाही. त्याचबरोबर पावसाळ्यात तो पुल वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पूर्वीच्या खचलेल्या पुलाची तात्काळ दुरुस्ती करून तो पुल वाहतुकीस खुला करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे वारंवार केली होती मात्र नागरिकांच्या या मागणीकडे नगर पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी नागरिकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलाजवळ एकत्र होत जन आक्रोश आंदोलन केले. शहरातील श्री.साईबाबा मंदिर संतोषी माता मंदिर व गंगामाई घाट याच परिसरात असून त्यासाठी शहरातील आबाल वृद्ध भाविक भक्त येथे देवदर्शनासाठी जात येत असतात. मात्र पूल खचल्याने या नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासाठी येत्या आठ दिवसात या पुलाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर नगरपालिकेवर मोर्चा काढू असा इशारा ही माजी नगरसेवक कैलासशेठ वाकचौरे, माजी नगरसेविका अल्पना तांबे, शिरीष मुळे, ज्ञानेश्वर कपेॅ, कैलास लोणारी, निलेश जाजू, अविनाश थोरात, संजय शिंदे, संग्राम जोंधळे, चंद्रशेखर कानडे, भाऊ जाखडी, सुषमा तवरेज, संजय छत्रिय, अमोल खताळ, दीपक भगत, राहुल भोईर यांच्या सह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.