आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी केला सूर्य नमस्काराचा विक्रम

0

कोकमठाण /कोपरगाव  :- विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित, आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलातील ७२०० विद्यार्थी व शिक्षकांनी दररोज १२ सूर्यनमस्कार केले. या प्रमाणे २१ जून २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत २,४७,९९,६९२ सूर्यनमस्कार पूर्ण केले असून या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली आहे. या विक्रमाची अधिकृत उदघोषणा आज जागतिक योग दिनाच्या दिवशी एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी अशोक आदक यांनी केली.             

या विक्रमाची नोंद झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह यावेळी अधिकारी अशोक आदक यांनी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाला बहाल केले. यावेळी संत परमानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, संत मांदियाळी, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, विष्णुपंत पवार, प्रभाकर जमधडे, विठ्ठलराव होन, जाधव भाई पावसिया आदि मान्यवर उपस्थित होते.          यावेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले की, आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये अध्यात्मिक संस्काराबरोबरच ध्यान, योग, सूर्यनमस्कार यांच्या माध्यमातून शरीर व मनाच्या सुदृढतेसाठी कार्य केले जाते. हाच संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा यासाठी सर्व विद्यार्थी दररोज ध्यान करतात. त्यांच्या शरीर सुदृढतेसाठी सूर्यनमस्कार हा उपक्रम वसतिगृह दैनंदिनीमध्ये सामाविष्ट करण्यात आला. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून संकुलातील विद्यार्थी व शिक्षक यांचे माध्यमातून  २१ जून २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत २.५ कोटी सूर्यनमस्कार पूर्ण करण्याचा संकल्प सोडला.        

आज रोजी प्रत्यक्षात २.५ कोटीपेक्षा जास्त सूर्यनमस्कार पूर्ण झाले असून हा उपक्रम यापुढे कायमस्वरूपी असाच सुरु राहणार आहे. संकुलातील विद्यार्थ्यांनी केलेल्या जास्तीत जास्त सूर्यनमस्काराची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली, याचा मनस्वी आनंद तसेच अभिमान आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये वसुंधरा संवर्धनासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून एक लाख वृक्ष लागवड व संगोपनाचा यावेळी त्यांनी संकल्प सोडला.

       आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थांनी घेतलेल्या संकल्पाची पुर्ती झाली त्याचबरोबर जास्तीत जास्त सूर्यनमस्कार केल्याचा विक्रमाची नोंद झाली. यामुळे आत्मा मालिक शैक्षणिक  व क्रीडा संकुलासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या संकल्पपूर्तीसाठी शालेय व्यवस्थापक सुधाकर मालिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल, सर्व प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here