मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (25 मे) ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीच्या प्रशासनात झालेल्या कलहात त्यांनी पवारांचा पाठिंबा मागितला. त्यावर आमचा आप ला पूर्ण पाठिंबा आहे असं शरद पवार म्हणाले. यासाठी केजरीवाल यांनी शरद पवारांचे आभार मानले.
याप्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, “जेव्हा 2015 मध्ये जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा केंद्र सरकारने अधिकाऱ्यांसंदर्भात एक अध्यादेश काढला गेला. दिल्ली सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांबाबतचे अधिकार केंद्राने स्वतःकडे घेतले. सुप्रिम कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला. पण आता हे विधेयक संसदेत मांडलं जाईल. त्यासाठी भाजपविरोधी पक्षाचं समर्थन आम्हाला हवं आहे. देशावर प्रेम करणारे लोक आम्ही जोडण्याचं काम करतोय.
आम्ही शरद पवारांना आवाहन केलं की, तुम्ही तर आम्हाला पाठींबा द्या पण इतर पक्षांनाही एकत्र करा. जर राज्यसभेत हे विधेयक भाजपला मंजूर करता आलं नाही तर ती 2024 ची सेमीफायनल असेल.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “दिल्ली आणि पंजाब च्या समस्या या त्या राज्याच्या नाही असं आम्ही मानतो. माझ्या पक्षाचे सहकारी,महाराष्ट्रातील जनता त्यांचं समर्थन करतील. मला राजकारणात येऊन 56 वर्षं झाली. प्रत्येक राज्याच्या नेत्यांबरोबर माझे व्यक्तिगत संबंध आहेत. आम्ही तुमच्याबरोबर आहोत याची आम्ही अरविंद केजरीवाल यांना ग्वाही देतो.”
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही भेट झाली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात केंद्र सरकारनं आणलेल्या अध्यादेशाबाबत विरोधकांची एकजूट करण्यासाठी केजरीवाल सध्या वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेत आहेत. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपचे खासदार राघव चढ्ढादेखील उपस्थित होते.
“आमची ताकद मोदी सरकारने घेतली. 8 वर्षं सर्वोच्च न्यायालयात लढल्यानंतर निकाल आमच्या बाजूने लागला, पण काही दिवसांत केंद्र सरकारने हा निकाल बदलला. ह्यांचे लोक न्यायपालिकाविरोधात, न्यायाधिशांविरोधात वाईट बोलतात, टीका करतात त्यांना देशविरोधी बोलतात. असा आमचा देश चालू शकत नाही. उद्या हे राज्यघटनाही मान्य करणार नाहीत”, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. ते पुढे म्हणाले, “मी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की ते आम्हाला साथ देत आहेत. पंजाबमध्ये राज्यपालांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलवू दिलेलं नाही. तुम्ही यावर विश्वास ठेऊ शकता का. हे चाललंय.
संसदेत हे बील येईल. 2024 चं हे सेमी फायनल असेल. हे बील पास होऊ शकलं नाही की समजायचं की 2024 ला भाजपची सत्ता येणार नाही,” असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
“शिवसेना हे तर याचे सगळ्यांत मोठे पीडित आहेत. दिल्लीत आॅपरेशन लोटस केलं. पण आमचा एकही आमदार त्यांना घेता आला नाही. म्हणूनच त्यांनी असा अध्यादेश आणला. हा त्यांचा अहंकार आहे”, असं ते पुढे म्हणाले. मी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे, पक्षाचे आभार मानतो. आम्ही नातं टिकवणारे आहोत. हे नातं आम्हीही शेवटपर्यंत टिकवू, असं केजरीवाल यांनी सांगितलं.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा अरविंदजी आले आहेत. आम्ही राजकारणापलिकडे जाऊन नातं जपत असतो. आम्ही नातं सांभाळणारी लोक आहोत. लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही सगळे देशप्रेमी एकत्र आलोय. अरविंद केजरीवाल त्यांच्याबाजूने सर्वोच्च न्यायालयाने काही निकाल दिला. पण त्याविरोधात केंद्राने अध्यादेश काढला. काही दिवसांनी केंद्रच सगळं चालवेल”.