कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गौतम सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नेत्रदीपक कामगिरी करतांना विक्रमी ०१ कोटी १७ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संजय आगवन, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, काही वर्षापूर्वी अतिशय खडतर परिस्थिती निर्माण झालेली असतांना देखील न डगमगता या परिस्थितीवर मात करत प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करून गौतम सहकारी बँक सातत्याने प्रगतीच्या दिशेने झेप घेत आहे. सचोटी व बँकेचे ठेवीदार,कर्जदार यांच्या विश्वासावर दरवर्षी नफ्याचा विक्रम स्थापित करीत आहे. बँकेच्या अहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात एकूण नऊ शाखा कार्यरत असून सर्व शाखा प्रगतीपथावर असून त्या-त्या शाखेच्या कार्यक्षेत्रातील छोटे-मोठे व्यावसयिक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कर्मचारी यांची वेळेत आर्थिक गरज पूर्ण करणारी संस्था म्हणून गौतम बँकेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जागतिक स्पर्धेच्या युगात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जावून आपली प्रगती साधण्यासाठी बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करून बँकेच्या सर्व ग्राहकांना डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे बँकेचा बहुतांश कारभार पेपरलेस होवून बँकेचा आर्थिक खर्च वाचविला आहे. ३१ मार्च २०२५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ०१ कोटी ५० लाखाच्या तरतुदी करून बँकेस ०१ कोटी १७ लाखाचा निव्वळ नफा मिळाला आहे. आज मितीस बँकेचे वसूल भाग भांडवल ०६ कोटी ३५ लाख आहे. बँकेच्या ठेवी १२४ कोटीच्या असून बँकेने रू ८० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. गुंतवणूक ५७ कोटी ५८ लाख असून सी.डी.रेशो ६४.७७ % आहे. राखीव निधी व इतर निधी १६ कोटी ५८ लाख इतका आहे. रिझर्व बँकेच्या माफदंडाप्रमाणे सी.आर. ए. आर. ९% आवश्यक असून आपल्या बँकेचा तो १८.६८% आहे. बँकेचे नक्त मुल्य १२ कोटी ५४ लाख इतके आहे. ग्रास एनपीए ६.५३% इतका असुन निव्वळ एनपीए शुन्य टक्के राखला आहे.वार्षिक सभेत मान्यता घेऊन सभासदांना लाभांश वाटप करणार असल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.बँकेने केलेल्या दिमाखदार कामगिरीबद्दल मा.आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.
मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या बहुमोल मार्गदर्शनातून गौतम बँकेची प्रगती होत आहे. बँकेची ही प्रगती केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही, तर सामाजिकदृष्ट्या देखील तेवढीच महत्त्वपूर्ण असून त्याचा थेट संबंध त्या बँकेच्या कार्यक्षेत्राच्या आर्थिक स्थिरतेशी आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बँकेची कामगिरी उल्लेखनीय असून बँकेचे मजबूत धोरण आणि व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट कारभाराचे फलित आहे. बँकेची प्रगती अनेक बाबींवर अवलंबून असून बँकेच्या होत असलेल्या प्रगतीतून बँकेची कार्यक्षमता आणि सेवा प्रदान करण्याची पद्धत प्रतिबिंबित होत आहे. बहुतांश सर्वच बँका डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांसाठी विविध सेवा पुरवितात यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, युपीआय आणि इतर डिजिटल साधनांचा वापर गौतम बँक प्रभावीपणे राबवीत आहे त्यामुळे बँकेच्या प्रगतीबरोबरच ग्राहकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा जलद गतीने मिळत आहेत.