संगमनेर : सिन्नर येथील उडान फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार संगमनेरच्या आर्या सुनील नवले हिला प्राप्त झाला. एका जीवघेण्या अपघातात समयसूचकता व धाडस दाखवत आपल्या आईचे प्राण आर्या नवले हिने वाचवले होते. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सिन्नर येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सिन्नर नगरपालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर व नाशिक येथील जीवन मार्गदर्शक व्याख्यात्या नीता अरोरा यांच्या हस्ते आर्या नवले हिला ‘बालशौर्य पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला. नाशिक जिल्हा बाल विकास मंडळाचे न्यायाधीश गणेश कानवडे, उडान फाउंडेशनचे अध्यक्ष भरत शिंदे, वाजे विद्यालयाचे प्राचार्य वारुंगसे, बांधकाम व्यावसायिक सतीश दुबे, गजानन जगताप व नितीन आव्हाड पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित होते.
संगमनेर मधील अकोले नाका परिसरात झालेल्या अपघातात आर्याने मोठ्या धाडसाने आपल्या आईचे प्राण वाचवले होते. आर्या स्वतः रात्रभर तापाने आजारी होती. सकाळी तिची आई मनीषा नवले या स्कुटी वरून तिला दवाखान्यात घेऊन चालल्या होत्या. समोरून चुकीच्या दिशेने आलेली दुचाकी आणि मागून आलेल्या जीपमध्ये सापडलेली त्यांची स्कुटी जीपच्या धडकेने खाली पडली. या अपघातात मनीषा नवले जीपच्या मागील टायरच्या अगदी पुढ्यात पडल्या होत्या. विरुद्ध बाजूला पडलेल्या आर्याने उठून मोठे धैर्य, समय सूचकता आणि प्रसंगावधान राखत आईच्या हाताला धरून मागे ओढले. अवघ्या काही सेकंदात आर्याने ही कृती केल्याने जीपच्या टायर खाली जाण्यापासून मनीषा नवले वाचल्या, परंतु त्यांच्या उजव्या हाताच्या पंजावरून जीपचे चाक जाऊन त्यांना गंभीर दुखापत झाली होती. आर्याच्या या धाडसी कार्याची दखल घेत उडान फाउंडेशनने तिची बालशौर्य पुरस्कारासाठी निवड केल्याचे संस्थेचे अध्यक्ष भरत शिंदे यांनी सांगितले.देव मंदिरात असतो, तो माणसात भेटायला हवा. जो दुसऱ्यांना मदत करतो तोच खरा माणूस. आर्या सारख्या शौर्यवान मुलीमध्ये मला खरा माणूस दिसतो, असे प्रशंशोदगार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर यांनी काढले. नीता अरोरा म्हणाल्या की, पालकांनी आपली स्वप्ने मुलांवर न लादता त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू द्यावे. मुलांनाही आपले आई-वडील आपल्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात याची जाणीव ठेवली तर भविष्यात नक्कीच सोनेरी दिवस येतील.सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत शिंदे यांनी केले. अंकुश सहाणे यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब शेळके, बाळासाहेब खैरनार, संदीप चौधरी, गणेश तांबोळी, सुनील निर्मळ, यश बेडेकर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
चौकट : आर्याचे आ.थोरात यांचेकडून कौतुक..!
आर्या नवले हिने केलेल्या अतुलनीय धाडसाचे तत्कालीन महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही कौतुक केले होते. एका विशेष कार्यक्रमात त्यांनी आर्या नवले हिचा सत्कार, सन्मान देखील केला होता.
चौकट : आर्या शिकत असलेल्या स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलनेही तिच्या कार्याची दखल घेत तिला यावर्षीचा ‘वीरश्री’ पुरस्कार घोषित केला होता. दोन दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि शाळेच्या संस्थापिका संज्योत वैद्य, अरविंद वैद्य, अजित काकडे आदर्श शिक्षक दत्तात्रेय आरोटे, ज्येष्ठ पत्रकार किसन हासे यांच्या उपस्थितीत तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.