कोळपेवाडी वार्ताहर – विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागतांना त्यांना त्रास होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी ‘जनता दरबार’ व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेवून तात्काळ सबंधित अधिकाऱ्याकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेवून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच जाब विचारून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळेंच्या जनता दरबारात आपले प्रश्न आणि अडचणी घेवून येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढती असल्याचे चित्र सोमवार रोजी तहसील कार्यालयात झालेल्या जनता दरबारात दिसून आले.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.१०) रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला. सर्वच विभागाचे प्रश्न घेवून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे फक्त महसूल विभाग, भूमी अभिलेख, वनविभाग व शेती महामंडळ ह्या विभागाच्या संदर्भातच नागरिकांनी आपल्या अडचणी मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले होते परंतु या जनता दरबारात देखील प्रश्न घेवून येणाऱ्या नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठी गर्दी केली होती. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी नागरिकांचे प्रश्न व अडचणी सविस्तरपणे जाणून घेतल्या. या अडचणी व प्रश्नांची पार्श्वभूमी सबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेवून तक्रारदार व अधिकारी यांच्याशी समोरासमोर चर्चा करून संबंधित प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढून हे प्रश्न मार्गी लावले आहे.
याप्रसंगी तक्रारदार नागरिकांनी लेखी स्वरूपाचे अर्ज दाखल करून त्याचबरोबर तोंडी तक्रार करत आ.आशुतोष काळे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. या कैफियत आ.काळे यांनी जाणून घेवून महसूल, वनविभाग, शेती महामंडळ, भूमी अभिलेख या विभागाच्या संबंधित विविध विषय या जनता दरबाराच्या माध्यमातून सोडविले.मतदारसंघातील विविध गावातून महिला,पुरुष तक्रारदार मोठ्या संख्येने तहसील कार्यालयातील जनता दरबारासाठी उपस्थित होते. यावेळी तहसील प्रशासनाच्या सबंधित ज्या सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत अशा नागरिकांच्या लेखी तक्रारींचे निवारण करण्यात आले. नागरिक त्यांच्या समस्या थेट आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधीपुढे मांडून या समस्या त्वरित सबंधित शासकीय अधिकाऱ्यांपुढे जात होत्या. प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद सुधारून आ.आशुतोष काळेंच्या पुढाकारातून समस्यांचे त्वरित निराकरण होवून जागेवरच न्याय मिळत असल्यामुळे प्रश्न घेवून आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान सुखावणारे होते.
या प्रसंगी सर्व सामन्य नागरिकांचे प्रश्न व कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी अधिकार्यांना सूचित करतांना सांगितले की, शासकीय कार्यालयात आपल्या अडचणी व प्रश्न घेवून येणाऱ्या नागरिकांना सर्व बाबतीत सखोल माहिती असतेच असे नाही. त्यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रश्न व अडचणी तातडीने सुटावे यासाठी नागरिकांना समजून सांगावे.नागरिकांनी देखील आपल्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी. जनता दरबार नागरिकांच्या समस्या सुटण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अधिकारी व नागरिकांनी एकमेकांशी सुसंवाद साधून प्रश्न शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी. मी मतदार संघातील जनतेचा लोकप्रतिनिधी आहे. जनतेच्या अडचणी व प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य असून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी यापुढे देखील जनता दरबार सुरूच राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, गटविकास अधिकारी संदीप दळवी, भूमी अभिलेख विभागाचे डावरे, वन विभागाचे सानप, शेती महामंडळाचे जोंधळे आदींसह शासकीय अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.