आ.आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना आवर्तन सुरु

0

पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या कोपरगावकरांना दिलासा

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाल्यामुळे मागील काही दिवसापासून कोपरगाव शहरातील नागरिकांना दहा ते बारा दिवसांनी पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेनुसार गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना ओव्हर फ्लोच्या पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे.

         

पावसाळा सुरु होवून जवळपास दोन महिन्याचा कालावधी होत आला आहे. परंतु अजूनही कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. अशीच काहीशी परिस्थिती धरण क्षेत्रात देखील असून कोपरगाव मतदार संघ अवलंबून असलेल्या धरण क्षेत्रांमध्ये देखील पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे धरणामध्ये देखील पुरेसा पाणी साठा नाही. त्यामुळे पुढील आवर्तन येईपर्यंत साठवण तलावातील पाणी जपून वापरावे लागत असून परिणामी कोपरगावकरांना करण्यात येणारा पाणीपुरवठा उशिराने होत आहे.

नागरिकांना उशिराने होत असलेल्या पाणी पुरवठ्याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून कोपरगाव शहरात निर्माण झालेली तात्पुरती पाणी टंचाई दूर करण्यासाठी गोदावरी कालव्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ओव्हर फ्लोच्या पाण्यातून आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सुचनेनुसार मंगळवार (दि.२३) रोजी नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरीच्या डाव्या-उजव्या  कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील साठवण तलाव भरल्यानंतर निर्माण झालेली तात्पुरती पाणी टंचाई दूर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here