कोपरगावात राष्ट्रवादीचा शिर्डी लोकसभा युवक मेळावा संपन्न
कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षी २ जुलैला राजभवनात झालेल्या घडामोडीच्या वेळी आ. आशुतोष काळे परदेशात होते. त्यावेळी होणाऱ्या घडामोडीच्या वेळी आ. आशुतोष काळे वेळेत पोहोचू शकले नाही. नाही तर आज परिस्थिती वेगळी असती. तरी देखील भविष्यात ती वेळ येणारच आहे असे सूचक वक्तव्य करून आ. आशुतोष काळे भविष्यात मंत्री होणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आ. आशुतोष काळेंच्या मंत्रीपदाबाबत झालेल्या घडामोडीबाबत केले. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा (शिर्डी लोकसभा) युवक मेळावा नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि.२३) रोजी कृष्णाई बँक्वेट हॉल कोपरगाव येथे पार पडला याप्रसंगीते बोलत होते.
पुढे बोलतांना प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण म्हणाले की, २०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले परंतु कोविड महामारी येवून विकास कामांना ब्रेक लागल्यामुळे आरोग्याच्या कामाला प्राधान्य द्यावे लागले. कोविड गेला व त्यानंतर काही कारणास्तव महाविकास आघाडीचे सरकार देखील गेले.त्यामुळे आपल्या विकास कामांना थांबविण्यात आले.राष्ट्रवादीच्या आमदारांचे म्हणणे होते वेगळी भूमिका घ्यावी. ती भूमिका उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी घेतल्यामुळे आ. आशुतोष काळे कोपरगावचा विकास करू शकले. विचारधारा कशी जिवंत कशी ठेवायची असते याचे उत्तम उदाहरण अजितदादा पवार आहेत.भाजप, शिव सेनेसोबत सत्तेत असलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सोबत घेवून जे काम केले होते ते काम सर्व समाजाला सोबत घेवून सर्वाना न्याय देण्याचे काम अजितदादा पवार करीत आहेत. आ.आशुतोष काळेंना मी अनेक वर्षापासून ओळखतो, ते कधीही जाती धर्माचे राजकारण करीत नाही. ते नेहमी विकास कामांचे राजकारण करतात. कोपरगाव मतदार संघात अनेक वर्षापासून रखडलेली कामे सुरु आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निवडून येण्यात राष्ट्रवादी युवकचे मोठे योगदान आहे असे निवडून आलेल्या प्रत्येक आमदारांनी अभिमानाने म्हटले पाहिजे असे काम करा व आ. आशुतोष काळेंना ५० हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आणण्याचा संकल्प करा असे आवाहन त्यांनी उपस्थित युवा कार्यकर्त्यांना केले.
यावेळी आ.किरण लहामटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, कोपरगाव शहराध्यक्ष सुनील गंगूले, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गाडे, जिल्हा सरचिटणीस मधूकर टेके, जिल्हा सचिव विठ्ठलराव आसने,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा, धोंडीराम वक्ते, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, अकोले युवक तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संदीप चोरगे, कैलास बोरुडे, श्रीरामपूर शहराध्यक्ष अभिजित लिपटे, श्रीरामपूर युवक अध्यक्ष तौफिक शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.